मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाअंतर्गत कुरबुरी सुरु असून, दोन्ही गट सक्रीय झाले आहेत. त्यामुळेच शिंदे गटाकडून भाजप तर भाजपकडून शिंदे गटातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते फोडले जात आहेत. भाजपच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या अंतर्गत वादाची कुणकुण थेट हायकमांडपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे एकमेकांचे नेते फोडू नका अशी सूचना भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी दोन्ही गटाच्या नेत्यांना दिली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आहेत. हे दोन्ही नेते सत्तेत एकत्र असले तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट आणि भाजपच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. स्वत:चे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून होत आहे. त्यातच भाजपा आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचेही दिसत आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात असले तरी स्थानिक पातळीवर वेगळेच चित्र आहे.
स्थानिक पातळीवरती शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. शिंदे गटाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे भाजप आणि शिंदे गटाने एकमेकांचे नेते – कार्यकर्ते फोडू नये. शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी करु नका अशा सूचना भाजप वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत. फोडोफाडीचे रुपांतर संघर्षात होऊ नये यासाठी आता थेट भाजप नेतृत्वानेच यात लक्ष घातल्याचे दिसत आहे.
अलिखित कराराची चर्चा
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नगरसेवकांना भाजप आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. शिंदे गटाकडूनही याला चोख प्रत्युत्तर म्हणून भाजपचे कार्यकर्ते फोडले जात होते. हे फोडाफोडीचे राजकारण थांबवण्यासाठी भाजपा नेत्यांनी शिंदे गटासोबत अलिखित करार केला असल्याची चर्चा आहे. आता दोन्ही पक्षनेते सामंजस्याने हे प्रकरण सांभाळत असल्याचे सांगितले जात आहे.
Politics Shinde Group BJP High command Instructions