पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केलं आहे. यावर अमोल कोल्हे यांनी वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचे हे आम्ही ठरवत असतो, असं म्हणलं आहे. कोल्हे यांच्या अशा सूचक विधानामुळे ते भाजपमध्ये जाणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत.
डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. यापूर्वी ते शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले. त्यामुळेच ते सध्या विद्यमान खासदार आहेत. आणि आता ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी आढळराव पाटीलच काय अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत आहे, असं विधान केलं होतं. त्यावर अमोल कोल्हे यांना प्रतिक्रिया दिली असून, राजकीयदृष्ट्या त्यांच्या विधानात काही गैर नाही, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपने आतापासूनच शिरूर मतदारसंघात सुरू केलेले दौरे सुरु केले असल्याने या चर्चेला जोर मिळाला आहे.
पटेल यांच्या या विधानाचं खंडन करण्याऐवजी अमोल कोल्हे यांनी सूचक विधान करून एकप्रकारे बळ देण्याचं काम केल्याने कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. भाजपाला आपली सत्ता टिकविण्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसणं यात राजकीयदृष्ट्या चुकीचं नाही. २०१४ मध्ये येथील मतदारांनी एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाला शिरूर लोकसभेतून मोठ्या विश्वासाने संसदेत पाठविले. शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली. मतदारांचा विश्वास असाच टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असं ते म्हणाले.
मी लोककल्याणाचा प्रयत्न करणार..
निवडणुका अद्याप खूप लांब आहेत. आताच पक्षांतर, नाराजी आदी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आकारण त्याविषयी काहीतरी बातम्या पेरत राहणं किंवा त्याविषयी चर्चा करणं मला अनाठायी वाटतं. निवडणूक हे माध्यम आहे, तर सत्ता हे साधन आहे. आपल्या मतदारांचा विश्वास सार्थ ठेवण्याचं. विकासाची वाट धरून लोक कल्याणाची कामे करण्याचं. तोच प्रयत्न मी करत राहणार आहे, असंही कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.
Politics NCP MP Dr Amol Kolhe BJP