मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या आठवड्यात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या सर्व प्रकाराची तत्काळ दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळेच छगन भुजबळ यांना आता वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. म्हणजेच त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळताच शिंदे-फडणवीस सरकार गेल्या वर्षी सत्तेत आले. या सत्तांतरानंतर अनेकांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. भुजबळ यांची ‘वाय प्लस’ सुरक्षा हटवून ‘एक्स’ करण्यात आली होती. मात्र, आता भुजबळ यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता मंत्री पदावर असलेल्या छगन भुजबळांना ‘वाय प्लस’ सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्याचबरोबर भुजबळांच्या नाशिक शहरातील निवासस्थानाबाहेरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
भुजबळांना एक्स सुरक्षा मध्ये पोलिसांकडून केवळ दोन अंगरक्षक पुरविण्यात येत होते. पण, आता पुरविण्यात आलेल्या ‘वाय प्लस’ दर्जाच्या सुरक्षेत ११ सुरक्षा कर्मचारी असणार आहे. हे सर्व स्थानिक पोलिस असणार आहे. त्याचबरोबरच २ ते ५ विशेष सुरक्षा कर्मचाऱ्यांचा (एसपीओ) समावेश असणार आहे. या सुरक्षेच्या ताफ्यात पायलट व्हॅन, एसपीओ व्हॅन, पोलिस व्हॅन (एक्सॉर्ट) यांचा समावेश असणार आहे. सत्तांतरणानंतर जुलै २०२२ मध्ये खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा लागू झाली. आता भुजबळांनाही ती मिळणार आहे.