नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने गंभीर भाजलेल्या ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती. तेव्हा पासून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राणी दशरथ चव्हाण (मुळ रा.मनमाड हल्ली सात माऊली चौक, श्रमिकनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. चव्हाण या गेल्या सोमवारी (दि.३) आजारी वडिलांना भेटण्यासाठी श्रमिकनगर येथे आल्या होत्या. घराच्या गच्चीवरून गेलेल्या अतिउच्च क्षमतेच्या वीजतारेच्या संपर्कात आल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. गणेश पवार यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना मंगळवारी (दि.११) डॉ. सतिशकुमार मिना यांनी त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.