नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन आणि नाशिक जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉ. अद्वय हिरे-पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले आहे. मुंबईत मातोश्रीवर जाऊन ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ही बाब आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
मालेगाव तालुक्यासह परिसरात डॉ. अद्वय हिरे-पाटील यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. त्याशिवाय कृषी, सहकार आणि अन्य क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. आता त्यांनी ठाकरे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ भाजपातील मालेगावचे अन्य नेते व पदाधिकारी ठाकरे गटात जाण्याची चिन्हे आहेत. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून सरकार असूनही कामकाज होत नसल्याची खद-खद अद्वय हिरे यांनी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखत मालेगांव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. अद्वय हिरे-पाटील हे माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे चिरंजीव आहेत. तर, त्यांचे बंधू डॉ. अपूर्व हिरे हे नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. हिरे घराण्यात राजकारणाची मोठी परंपरा आहे. डॉ. अपूर्व हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत डॉ. अद्वय हिरे हे ठाकरे गटाकडून धुळे-मालेगाव मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जाते. सध्या याठिकाणी भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे खासदार आहेत. डॉ. अद्वय हिरे यांच्यामुळे डॉ. भामरे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
Politics Malegaon BJP Leader Join Thackeray Group Shivsena
Dr Advay Hire Patil