पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान असे अभिमानाने सांगणारे आणि सर्वसामान्यांचे सरकार असल्याचा प्रचार करणारे शिंदे-फडणवीस-पवार सरकार प्रत्यक्षात कोट्यवधींची उधळपट्टी करीत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सर्व आकडेवारी जाहीर करत थेट सरकारला सवाल केला आहे. त्यामुळे या सर्व बाबीची जोरदार चर्चा राज्यात होत आहे.
गेल्या वर्षी शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि भाजपच्या साथीने सरकार सत्तेवर आले. त्यानंतर गेल्या महिन्यात अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली. पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आहे. हे सरकार दमदार काम करीत असल्याचा दावा तिन्ही नेत्यांकडून केला जात आहे. असे असताना सरकार जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च का करीत आहे, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे, रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे आहेत.
रोहित पवार यांनी ट्विटद्वारे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणतात की, सरकारच्या पहिल्या सात महिन्यात जाहिरातीवरील खर्च ₹42.44 कोटी म्हणजेच दिवसाला ₹20 लाख खर्च झाला. शासन आपल्या दारी योजनेचा निव्वळ जाहिरातीचा ₹52.90 कोटी खर्च आहे. मागच्या वर्षात राबविलेल्या योजनांची यंदा जाहिरात करण्यासाठी ₹26 कोटी खर्च करण्यात आला. सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेसाठी एका वर्षाला ₹150 कोटी खर्च होत आहे. योजना राबविल्या आहेत, कामं केली आहेत, तर इतकी जाहिरात करण्याची खरंच गरज आहे का? केलेली कामं जनतेपर्यंत पोहचण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत का? हा वायफळ खर्च टाळून, सर्वसामान्यांसाठी कुठली योजना राबविता आली असती का? तुमचं काय मत आहे? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
politics maharashtra government expenses advertising