पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव धक्कादायक वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण या निवडणुकीत आपली नाव धोक्यात असल्याची जाणीव झाल्यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघात तळ ठोकला. पण तरीही भाजपचा पराभव झाला. या पराभवाची विविध कारणे सांगितली जात आहेत.
पुण्यातील कसबा पोटनिवडणुक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला असता तर त्याची एवढी चर्चा झाली नसती. पण भाजपच्या पराभवाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. राजकीय तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणानुसार भाजपने उमेदवारी देण्यापासूनच अनेक चुका केल्या. या मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्यानंतर ब्राह्मण उमेदवारच द्यायला हवा होता, असे अनेकांचे म्हणणे होते. पण भाजपने हेमंत रासने यांच्या माध्यमातून बहुजन चेहरा दिला. महाविकास आघाडीसाठी हीच संधी होती. त्यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली.
रवींद्र धंगेकर यांच्यासाठी हा मतदारसंघ नवा नव्हता. त्यांनी यापूर्वीही आपला कमाल या मतदारसंघात दाखवलेला आहे. शिवाय त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. लोकांना ते आपल्यातील वाटतात. कुठलाही बडेजाव नाही आणि मिरवणे नाही. लोकांमध्ये राहणे त्यांना आवडते. कसब्यामध्ये कुणीही त्यांना कारमध्ये बसून फिरताना बघितलेलं नाही. आपला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. अशात त्यांच्या बाजूने मतदारांचा कौल जाणे आश्चर्य वाटून घेण्यासारखे नव्हते. या एकूण परिस्थितीची जाणीव झाल्याने शिंदे आणि फडणवीस यांनी जनसंपर्काची मोहीम राबवली. शिंदे यांनी तर रात्री-अपरात्री लोकांच्या भेटी घेऊन रासने यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. याशिवाय अमित शहा, नितीन गडकरी या दिग्गजांनीही कसब्यात हजेरी लावली होती.
भाजपची मते काँग्रेसला
उमेदवारीवरून असलेल्या नाराजीने भाजपची २८ वर्षांपासूनची व्होटबँक काँग्रेसकडे वळली. केवळ कसब्यातील सर्वसामान्य जनतेनेच नव्हे तर भाजपच्याही लोकांनी धंगेकरांना मते दिली. त्यामुळेच त्यांना ११ हजार मतांनी विजय प्राप्त करता आला.
मनसे धंगेकरांच्या बाजूने
कसबा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छुप्या पद्धतीने धंगेकरांसाठी प्रचार केल्याची माहिती आहे. सोबतच सर्व पदाधिकाऱ्यांनीही धंगेकरांनाच मते दिली. विशेष म्हणजे पूर्वी धंगेकर मनसेत होते. २००९ च्या निवडणुकीत त्यांना मनसेनेच तिकीट दिले होते. आणि त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता.
दुरंगी लढत
कसबा पोटनिवडणूक आजपर्यंत तिरंगीच झालेली आहे. पण यावेळी प्रथमच दुरंगी लढत झाली. एकूण १७ उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत होते, पण धंगेकर आणि रासने यांच्याच प्रचाराची जोरदार चर्चा होती. विशेष म्हणजे शेवटच्या काही दिवसांमध्ये धंगेकर यांच्या प्रचाराचा वाढलेला जोर भाजपच्या पराभवाचे संकेत देणारा होता.
Politics Kasba By Poll Election BJP Defeat Analysis