मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्षभरापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना फोडले होते. पक्षातील कारभारामुळे त्रस्त झालेल्या आमदारांनी स्वत:च्याच पक्षाविरुद्ध उठाव केला होता. त्या घटनेला वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी हा उठाव अपयशी झाला नसता तर शिंदे यांनी स्वत:ला गोळी झाडून घेत आत्महत्या केली असती, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
भाजप सोबतच्या सरकार स्थापनेला येत्या ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी शिंदे गटावर टीका करत गद्दार दिवस पाळला आहे. तर शिंदे गट वर्षभरात केलेल्या कामांचे पोवाडे गात आहे. अशातच अत्यंत संयमी वक्तव्य करणाऱ्या दीपक केसरकरांनी उठावासंदर्भात सनसनीखेज वक्तव्य केले आहे. ‘अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केले. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर एकनाथ शिंदेंना वाटले, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहे. कारण, शिंदेंचा अपमान झाला, तो दिवस वर्धापनदिनाचा होता. वर्धापनदिनादिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचे उत्तर दिले पाहिजे. एकनाथ शिंदे रागवून गेले असते, तर परत येण्याची तयारीही दाखवली होती,’ असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
अशी पडली खिंडार
मराठी माणूस, मुंबई आणि हिंदूंचा श्वास असलेल्या शिवसेनेत कधी नव्हे इतके मोठे खिंडार वर्षभरापूर्वी पडले. एकनाथ शिंदे यांनी स्वत:सोबत चाळीसहून अधिक आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुरत, गुवाहाटी असा प्रवास झाला. चर्चा, वाटाघाटी झाल्या. सुमारे दहा दिवस चाललेल्या या घडमोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले.