मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला प्रचंड मोठे खिंडार पडल्याचे समोर आले असतानाच, अजूनही राज्यभरातून शिवसैनिकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. केवळ शिवसेना नाही, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत असल्याचे चित्र आहे. आता शिंदे गटाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला असून, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमधील शेकडो पदाधिकारी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा झटका दिला आहे. शिवसेना आणि मनसेच्या तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल होत या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
राजकीय पक्षांची वाढली चिंता
मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या सहभागाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिंदे – फडणवीस सरकारकडे आमदारांचे बहुमत असून, एक मजबूत सरकार राज्यामध्ये काम करत आहे. आम्ही दिवसेंदिवस लोकहिताचे निर्णय घेत आहोत. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. कारण आघाडीतही काही आलबेल दिसत नाही. कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होत असल्याने काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. दररोजचा ओघ पाहून सर्वच पक्ष चिंतातूर झाले आहेत. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच आम्ही कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.
Politics Eknath Shinde Group Join MNS Thackeray