जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे खडसे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. खडसे यांच्या स्वगृही परतण्याच्या वार्तेची राज्यभरात जोरदार चर्चा आहे.
काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असूनही डावलण्यात आल्याने किंबहुना राजकीय अडगळीत टाकल्याने आणि भाजपामधील अंतर्गत वादाला कंटाळून एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तसेच, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा खडसे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या सध्या भाजपच्या खासदार आहेत. म्हणजे, सासरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तर स्नुषा भाजपची खासदार असे वास्तव आहे. रक्षा खडसे यांच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांची अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
विरोधी पक्षनेतेपदापासून महसूल मंत्री असा खडसे यांचा प्रवास आहे. २०१४ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचा आदेश आला त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर फडणवीस आणि खडसे यांच्यात सातत्याने अंतर्गत वाद आणि सत्ता स्पर्धा सुरु होती. याच स्पर्धेतून पुढे फडणवीस यांनी खडसे यांना पक्षाबाहेर पडण्यास भाग पाडले असे म्हटले जाते.
दरम्यानच्या काळात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे खडसे यांना यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यानंतर खडसे हे भाजपमध्ये अक्षरश: विजनवासात गेले होते. त्यांनी वारंवार विनंती करूनही त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते. या सगळ्यामागे फडणवीस आणि गिरीश महाजन असल्याचा आरोप खडसे यांनी वारंवार केला होता. परंतु, त्यांच्या आरोपांची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली नव्हती. अखेर खडसे यांनी २०२० मध्ये आपला भाजप मूळ पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
गेल्या महिन्यात फडणवीसांची भेट
भाजपला सोडचिठ्ठी देतेवेळी खडसे म्हणाले होते की, माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला, असे खडसेंनी स्पष्ट केले होते. परंतु राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हटले जाते. गेल्याच महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असता त्याच व्यासपीठावर एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. यावेळी त्या दोघांमध्ये नमस्कारासह काही काळ चर्चा देखील झाली होती. या चर्चेविषयी एकनाथ खडसे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर एकनाथ खडसे म्हणाले की, मी नाशिकला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राजकारणात भेटीगाठी संस्कृती ही असतेच. राज ठाकरेंना सगळेच भेटतात. मीही कधीतरी कामानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विकास कामानिमित्ताने मी भेट घेऊ शकतो. मात्र, याचा काही वेगळा अर्थ काढू नये, असे खडसे यांनी म्हटले होते.
रक्षा खडसे म्हणाल्या..
या गाठीभेटीनंतर आता खडसेंच्या भाजप वाटेच्या वार्ता धडकल्या आहेत. भाजपा खासदार आणि नाथाभाऊ यांच्या स्नुषा रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे आणि मी अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलो होतो, परंतु शाह त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेटू शकले नाहीत. मात्र फोनवरून चर्चा झाली आहे. चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे मी त्यावर बोलू इच्छित नाही. ज्यांना राजकारण करायचे असेल ते करणारच आहेत. मात्र नाथाभाऊ भाजपात येणार आहेत हे मला माहिती नाही. मी भाजपात आहे आणि नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहेत असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
खडसे म्हणाले….
एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडताना सांगितले की, नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत, तसेच अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहांना भेटू नये, असा काही नियम आहे का? अमित शहा आणि पंतप्रधान मोदींशी माझा परिचय आजचा नसून फार पूर्वीपासूनचा आहे. मी अमित शहांना एकदाच भेटलो असे नाही, या आधीही मी अनेकदा त्यांना भेटलो आहे आणि नंतरही भेटणार आहे. फडणवीस यांनाही मी आधी भेटलो आणि पुढेही भेटणार आहे. त्यामुळे याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षात असण्याची अनेक उदाहरणे आहेत, असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले आहे. दरम्यान, खडसेंच्या खुलाशानंतरही त्यांच्या भाजप प्रवेश संदर्भातील उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चर्चेत
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीतील जाहीर सभेत भाषण करताना म्हणाले होते की, खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली. पाटील यांनी काल जळगावात पत्रकार परिषदेत पुन्हा खडसे आणि अमित शहांची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला. एकनाथ खडसे व अमित शाह यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, खडसे पुन्हा भाजपात जाणार का? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
Politics Eknath Khadse Reentry in BJP Amit Shah Call
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/