नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे राईट हँड अशी ओळख असलेल्या भाऊ चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊ चौधरी यांना गटामध्ये मोठी जबाबदारी दिली आहे. त्याचे नियुक्तीपत्र शिंदे यांनी स्वतः चौधरी यांना दिले आहे.
चौधरींच्या हकालपट्टीचे ट्विट संजय राऊत यांनी केल्यानंतर त्याच रात्री चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या जाण्यामुळे ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नाशकातील ११ माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता संपर्क प्रमुखही गेले. चौधरींनीच या सर्व माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. आता शिंदे गटाने भाऊ चौधरी यांना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती दिली आहे. हे गटातील मोठे पद आहे. ठाकरे गटात देण्यात आलेल्या संपर्क प्रमुख पदापेक्षा हे मोठे पद आहे. त्यामुळे त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ठाकरे गट सोडून आमच्याकडे आल्यास तुम्हाला मोठी जबाबदारी आणि नियुक्ती मिळेल, असा संदेशही शिंदे यांनी या माध्यमातून दिला आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1606678736442912774?s=20&t=s_7MGR1xabcp6AwlFp_img
शिंदे गटात प्रवेश करताच चौधरी यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. चौधरी म्हणाले होते की, मी गेली ३२ वर्षे शिवसेनेत काम करत आहे. गटप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, डोंबिवली शहर प्रमुख म्हणून मी जबाबदारी सांभाळली. पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाशिककरांच्या अनेक व्यथा घेऊन मी गेलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदनेही दिली. मात्र, त्यातील एकही काम मार्गी लागले नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली. विकासावर त्यांचा भर आहे. त्यामुळे मला जाणीव झाली की त्यांच्या नेतृत्वात मी अधिक चांगली जबाबदारी पार पाडू शकतो. यापुढील काळात मी माझ्या कामातून उत्तर देईन, असे त्यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/MiBhauChaudhari/status/1606338071640907776?s=20&t=s_7MGR1xabcp6AwlFp_img
Shivsena Bhau Chaudhari Shinde Group
Politics CM Eknath Shinde Appointment Bhau Chaudhari
Balasahebanchi Shivsena