ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण येथे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे दौरे वाढल्याने शिंदे गटात खळबळ माजली आहे. सध्या भाजप आणि शिंदे गट यांचे सरकार राज्यात आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले भाजता नेत्यांचे दौरे नवीन समीकरण उदयास आणणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याची माहिती देताना भाजपा आमदार संजय केळकर म्हणाले,‘केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभेचा दुसऱ्यांदा दौरा होत आहे. देशातील विविध लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी म्हणून नेमलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अनुराग ठाकूर आहेत. याच पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूर यांचा एकदिवसीय दौरा आहे. मागील वेळी त्यांचा दौरा तीन दिवसांचा होता.
१४ फेब्रुवारी रोजी अनुराग ठाकूर यांचा सकाळपासून दौरा सुरू होणार आहे. कळवा, मुंब्रा भागातून सकाळी नऊ वाजल्यापासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पक्षाअंतर्गत संघटनात्मक बैठका आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासह सर्व सहा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही ते घेणार आहेत. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपर्यंत अनुराग ठाकूर दोन ते तीन दौरे करणार आहेत.’
१८ मतदारसंघांवर भाजपाचे लक्ष
भाजपाने महाराष्ट्रातील जे १८ लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत. ते मतदारसंघ अधिक सक्षम करणे आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे, हा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्रात भाजपा मजबूत आहेच. पण लोकसभेत अधिक यश मिळावं, त्याअनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने लोकसभा मतदारसंघ बळकट करण्याचं काम आम्ही करत आहोत, असे आमदार केळकर म्हणाले.
Politics BJP Strategy MP Shrikant Shinde Trouble