मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्रिमंडळ विस्तारावरून पुन्हा एकदा प्रहार पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. अपक्ष आमदार म्हणून बच्चू कडू यांचा विद्यमान सरकारला पाठींबा आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशी चर्चा आहे. अशात कडू यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा युतीतील असंतुष्टांनी तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे.
वर्षभरापूर्वी सत्ता स्थापन झाली तेव्हा बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. त्यांनीदेखील दिव्यांग मंत्रालय देण्याची मागणी केली होती. मात्र, पहिल्या टप्प्यात कडू यांना संधी मिळाली नाही. नंतरच्या काळात त्यांना दिव्यांग मंत्रालय देण्यात आले. कडू यांनी यापूर्वीदेखील मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी खुलेआम सरकारवर टीका केली आहे. ‘भाजपसोबत गेलेल्या सर्व ५० आमदारांना फक्त विरोधकांकडून त्रास दिला जातोय, असं नाही. तर भाजपकडूनही काही जणांकडून त्रास दिला जात असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. विरोधकांकडून ५० खोक्यांचा आरोप करुन टीका केली जातेय. तशीच टीका मित्र पक्षाच्या काही जणांकडूनही करण्यात आली, असे बच्चू कडू म्हणाले.
शेतकऱ्यांबाबत चांगले निर्णय
राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर गेल्या वर्षभरात घडामोडी पाहिल्यात तर कुभी खुशी, कभी गम सारखी परिस्थिती आहे. काही निर्णय खरेच चांगले घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालय दिले. याचा मला आनंद आहेच. पण सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय फार महत्त्वाचे आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई दिली आहेत. तसेच आताही १५०० कोटींची भरपाई दिली. एकंदरीत आपण सात ते आठ हजार कोटींवर चाललोय’, असे बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, भाजपच्या मंत्र्यांकडून विकासकामे रोखली जात असल्याचा आरोपही कडू यांनी केला आहे. असे व्हायला नको. सन्मानाने वागणूक देणे गरजेचे आहे. विरोधक खिंडीत गाठत असताना भाजप मंत्र्यांची ही भूमिका अयोग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.