मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता आणि विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असते तरीही त्यांचे सरकार पडलेच असते, असा दावा विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भाने ते एका कार्यक्रमात बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता ते परिस्थितीला सामोरे गेले असते तर आज त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल करणे न्यायालयाला शक्य झाले असते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. त्यावर नार्वेकर यांनी असहमती दर्शवली. ‘उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता ते विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असते तरीही त्यांचे पद गेले असते. मग राज्यपालांचा आदेश चुकीचा ठरवून न्यायालयाने रद्द केला तरीही बहुमत नसलेल्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा पदावर नियुक्त करणे कसे योग्य ठरले असते,’ असा सवालही अॅड. नार्वेकर यांनी केला आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडल्याचे कोणतेही लेखी निवेदन माझ्यापुढे अद्याप सादर झालेले नसून १६ नव्हे, तर ५४ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर निर्णय घ्यायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘माझ्यापुढे दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात एकूण ५४ याचिका सादर केल्या आहेत. सुयोग्य वेळेत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक याचिकाकर्त्यांला आणि प्रतिवादीला बाजू मांडण्याची संधी द्यावी लागेल. साक्ष व उलटतपासणी होईल. नैसर्गिक न्याय तत्त्वाचे आणि पुरावा कायद्यातील तरतुदींचे पालन केले जाईल. त्यामुळे सुनावणीसाठी किती कालावधी लागेल, हे आताच सांगता येणार नाही,’ असेही ते म्हणाले.
विधीमंडळाची व्याप्ती वाढली
विधिमंडळ नियमावलीनुसार अध्यक्षांचे अधिकार विधानसभेपुरतेच मर्यादित होते. पण न्यायालयाने त्यांची व्याप्ती वाढविली आहे. आता पक्षप्रतोदाचा निर्णय घेताना राजकीय पक्ष, त्याची घटना, प्रमुख, कोणाकडे बहुमत आहे हे तपासून प्रतोदाला मान्यता द्यावी लागणार आहे, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.
प्रतोदाचा निर्णय लवकरच
भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता देताना पक्ष, प्रमुख आणि अन्य बाबी तपासण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे प्रतोद नियुक्तीविषयी शक्य तितक्या लवकर निर्णय घेतला जाईल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी कुठलाही निर्णय घाईघाईने न घेता विचारपूर्वक घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
Politics Assembly Speaker Narvekar Statement