नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झाले. महागाई, बेरोजगारी आणि महापुरुषांचा अपमान यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करणार आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी सीमावादावरुन जोरदार खडाजंगी झाली. त्यातच शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील वादही उफाळून आला. विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय कुणाला मिळणार यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले होते. अखेर हे कार्यालय शिंदे गटाला देण्यात आले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनानिमित्त शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट दोन्ही आमनेसामने आले. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे कार्यालय कुणाला द्यायचे असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्यावर तोडगा म्हणून आता कार्यालयाचे २ भाग बनवण्यात आले. त्यामुळे एकाच कार्यालयात शिंदे-ठाकरे गटाचे आमदार शेजारी शेजारी बसतील, असेही नियोजन करण्यात आले. मात्रन त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे होती. अखेर हे कार्यालय शिंदे गटाला देण्यात आले आहे. छोट्या पक्षांचे कार्यालय असलेल्या बॅरेक क्रमांक ५ मध्ये ठाकरे गटाला कार्यालय देण्यात आले आहे.
राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून वाद पेटला होता. ठाकरे गटाने कार्यालयावर ताबा मिळविला होता. नागपुरातही हाच प्रकार घडला. आपल्या आमदारांना बसण्यासाठी माझे कार्यालय आहे. आपल्या मंत्र्यांची देखील कार्यालय आहेत. त्यामुळे संघर्ष कशाला अशी समजूतदारपणाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या अधिवेशनात घेतली होती आणि वाद टाळला होता. तीच भूमिका यावेळी देखील ते घेतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयाबाहेर २ पाट्या लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर शिंदे गटाने या कार्यालयावर कब्जा मिळवला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदार शिंदे गटात सहभागी झालेत. तर उर्वरित आमदार आजही उद्धव ठाकरेंच्यासोबत आहेत. त्यात विधिमंडळात अद्याप शिंदे गटाला मान्यता देण्यात आली नसल्याने कागदोपत्री उद्धव ठाकरे यांचा गटच अधिकृत मानला जातो. त्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, १९९० पासून विधानभवन परिसरात शिवसेनेला जे कार्यालय दिले जाते तेच यावेळीही दिले गेले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. या कार्यालयात आमचे कर्मचारी आजपासूनच रूजू झाले आहेत. कामकाज सुरू केले आहे. हे कार्यालय आमच्याकडेच राहील. शिंदे गटाला मोठे कार्यालय द्या, वाटल्यास महाल द्या पण आम्ही हे कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता.
Politics Assembly Session Shivsena Party Office Shinde Thackeray Group