नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. आशिष देशमुख यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षशिस्त मोडल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अनेकदा वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. ‘मोदी आडनाव’ या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायाची माफी मागावी, असे देशमुख म्हणाले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संगनमत केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी आशिष देशमुख यांना निलंबित करण्याचे पत्र प्रसिद्ध केले. देशमुख यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. देशमुख हे नागपूरच्या काटोल येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी आमदार आहेत, त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च रोजी आशिष देशमुख यांना पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. देशमुख यांनी ९ एप्रिल रोजी उत्तर दिले. देशमुख यांच्या उत्तरावर शिस्तपालन समितीत चर्चा झाली. यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आशिष हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरंजीव आहेत.
Politics Ashish Deshmukh Congress Action