सिहोर (मध्य प्रदेश) – येथील शिवसेनेच्या महिला नेत्याच्या घरातील देहविक्रय व्यवसायाचा भांडाफोड मध्य प्रदेश पोलिसांनी केला आहे. चार युवती, तीन गिऱ्हाईकांसह महिला व्यवस्थापक, संचालिका आणि चालकाला अटक करण्यात आली आहे. ज्या महिलेच्या घरात कारवाई करण्यात आली ती महिला स्वतःला समाजसेविका सांगते. तिने शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची निवडणूकही लढवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारावरून पोलिसांनी सिहोर बसस्थानकाजवळील अनुपमा तिवारी हिच्या घरी छापा मारला. तिथे देहविक्रय व्यवसाय सुरू होता. पोलिसांच्या कारवाईमुळे एकच गोंधळ उडाला परंतु या गोंधळात कोणीही पलायन करू शकले नाही. पोलिसांनी चार युवती आणि तीन गिर्हाईकांना अटक केली. त्याशिवाय घटनास्थळावरून अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. सर्व युवती भोपाळजवळील असल्याचे सांगण्यात आले. या युवतींना इंदुलता नावाची व्यवस्थापक घरी आणत होती.
२०१५ रोजी नगराध्यक्षपदासाठी अनुपमा तिवारीने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. ती स्वतःला समाजसेविका असल्याचे सांगते. नेहरू युवा केंद्रातर्फे तिला काही वर्षापूर्वी योगाचार्य म्हणून सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करताना अनुपमा तिवारीचे काही वक्तव्यही समोर आले होते. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घरातून २८ हजार रुपये, दोन कार जप्त करण्यात आली आहेत.