सुदर्शन सारडा
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या अन् यंदा ऐन दिवाळीच्या सणात लोकशाहीचा उत्सव साजरा होतो आहे.त्याचा पहिला अध्याय मंगळवारी दुपारी संपला.आता लक्ष्मी पूजनाच्या चौथ्या दिवशी फटाक्यांचा धूर आकाशातून लोप पावेल आणि उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल. प्रगल्भ नाशिक जिल्ह्यात दिवाळी पेक्षा राजकीय फटाके आणि राजकीय चटके अधिक तीव्र असतात हे तसे नवीन नाही. परंतु. होऊ घातलेल्या संबंध जागांच्या लढाईत कार्यकर्त्यांची मात्र डबल दिवाळी साजरी होणार आहे.
पहिल्या दिवशी फोडलेल्या दहा हजाराच्या लढीचे भाग्य तब्बल तेवीस दिवसांनी अर्ध्यांच्याच नशिबी राहील. अशातच वात ओली न होऊ द्यायची किमया जो उमेदवार करेल त्याच्याच हाती त्या दहा हजाराच्या लढची वात येईल.आज आवाज आणि धूरा बाबतची महत्वकांक्षा प्रत्येकच्या ठायी असली तरी लोकांच्या मनी जो धुराचा ठसका पोहोचवणार नाही त्याला पाच वर्ष आपल्या भागाला सरकारी ठसका देण्याचेही भाग्य येणार आहे. रक्तात हुकूमत असलेले साहेब,काका,अण्णा,भाऊ,नाना,अप्पा असे एक से बढकर एक उमेदवार रिंगणात उभे असूनही यंदाच्या दिवाळीत त्यांना कमालीचे निमूट रहावे लागेल.
मोठ्या नेत्यांच्या डोक्यात उमेदवारी देताना किंबहुना ती घोषित करताना आधीच सुतळी बॉम्ब फुटल्याचे आपण पाहिले. परंतु राजकीय वातीचा ओरिजनल सुतळी बॉम्ब हा दिल्लीतच बनतो हे ही अधिक स्पष्ट समजले.
नेते येतील, हात जोडतील, हसून मनातल्या घर करण्यासाठी काही गुंठे मनाचा ताबा घेतील,कोल्ड फटाके भेट देतील,एक नावाच्या डबल माणसाला सिंगल शॉट देतील पण ठामपणा हा वातीच्या गती पेक्षाही तीव्र असेल.उमेदवारीची धामधूम अत्र तत्र सर्वत्र असताना माघारीच्या टेन्शन मध्ये हातात धरलेल्या सुरसुरीचा तडका नको लागायला इतकीच काय ती काळजी घेणे सध्या गरजेचे आहे.बाकी भाऊबीजेला मिळालेलं कर्गोट यंदा चांगलच उपयोगी पडेल यात कोणतीही शंका नाही.
जिल्ह्याची अर्ज दाखल मुदत संपली असली तरी ती फटाक्याच्या दुकानासारखी म्हणता येईल. पण विकत घेऊन हवेत उडवायची जिगर जो दाखवेल तो खरा सिकंदर ठरेल.यंदाच्या दिवाळीत खलनायक ठरणाऱ्या फटाक्यांचा बंदोबस्त करणे ही गरजेचे बनल्याने लक्ष्मी पूजनाच्या पुढचे तीन आठवडे मात्र तोंडी फटाक्यांनी गाजणार असल्याने कोणाला किती कानठळ्या बसतात हे बघणे अधिक सोयीचे ठरेल. थोडक्यात राजकीय भाषेत सांगायचे ठरले तर लक्ष्मी पूजन आणि दर्शन यातील फरक स्पष्ट करणारी यंदाची दिवाळी असल्याने त्याचा अलभ्य लाभ पुढचे अठरा दिवस असेल!
शुभ दीपावली