अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील एका खुनाच्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याने चुकीचा तपास केल्यामुळे त्याला राज्य सरकारने शिक्षा दिली आहे. एका माजी सरपंचाच्या खुनाचे हे प्रकरण होते. यात चुकीचा तपास झाल्याची सरकारने गंभीर दखल घेत अधिकाऱ्याला शिक्षा दिली आहे.
नगर येथील पारनेर तालुक्यात निघोज गावात माजी सरपंच संदीप वराळ यांचा खून झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्याकडे होता. सध्या आनंद भोईटे हे बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक आहेत. भोईटे यांनी खुनाचा तपास करताना बनावट साक्षीदारांची नोंद केली, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यांची साक्षीदार म्हणून नोंद करण्यात आली, त्यातील एक व्यक्ती हयातच नव्हती. अर्जुन गजरे असे मृत साक्षीदाराचे नाव आहे. तर दुसरे साक्षीदार प्रकाश रसाळ हे नोकरीसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. भोईटे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्यावर तपास सुरू झाला. तपासाअंती या गोष्टी उघडकीस आल्या.
आरोपींनीच केली तक्रार
खुनाच्या कटातील आरोपी बबन कवाद आणि मुक्ता इनामदार यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यांनी बनावट साक्षीदारांनी दिलेल्या माहितीवर आक्षेप घेतला. पण तक्रारीचा काहीही एक उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. अखेर सुनावणीमध्ये आनंद भोईटे यांनी बनावट साक्षीदार नोंदवल्याची बाब पुढे आली.
भोईटेंची पगारवाढ रोखली
आनंद भोईटे यांना चुकीचा तपास करणे आणि बनावट साक्षीदार उभे करणे यासाठी दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांची पगारवाढ रोखण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यामुळे एकूणच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
Police Officer Wrong Investigation Punishment