इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या चित्रपटाला होणाऱ्या विरोधाचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात उचलून धरावा, ही घटना दुर्मिळच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत केरला स्टोरी या चित्रपटाला होणाऱ्या विरोधावरून काँग्रेसवर टिका केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे स्वतः पंतप्रधान प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. बेल्लारी येथे त्यांची सभा होती. या सभेत त्यांनी केरला स्टोरी या चित्रपटाला होणाऱ्या विरोधावरून काँग्रेसवर निशाणा साधला. या चित्रपटाला केरळ सरकार आणि काँग्रेसकडून जोरदार विरोध होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यात येत आहे, असा आरोप केरळ सरकारने केला आहे. तर काँग्रेसने चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी लावून धरली आहे. या चित्रपटात चार महिलांना मुस्लीम समाजात घेऊन दहशतवादी संघटनेत सामील केले जाते, असे दाखविले आहे. त्यामुळे विरोध केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या विरोधावर आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित केरला स्टोरी हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. यामध्ये एका राज्यातील दहशतवादी कट दाखविण्यात आले आहेत. केरळ हे देशातील सर्वांत सुंदर राज्य आहे आणि येथील लोक परिश्रमी व प्रतिभावान आहेत. पण त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटांचा खुलासा या चित्रपटाने केला आहे,’ असे मोदी म्हणाले.
बॉम्बचा आवाज येतो, पण…
बॉम्ब-बंदूक आणि पिस्तुलाचा आवाज येतो, पण समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. न्यायालयाने दहशतवादाच्या या स्वरुपाबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. पण दुर्दैवाने काँग्रेस दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठिशी उभे आहे, या शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
काँग्रेसची सौदेबाजी
दहशतवादी प्रवृत्तीच्या लोकांसोबत काँग्रेस मागच्या दाराने राजकीय सौदेबाजी करत आहे. त्यामुळेच कर्नाटकमधील लोकांनी काँग्रेसपासून सावध राहिले पाहिजे. कारण काँग्रेसला असे काही करताना बघतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.
PM Narendra Modi on The Kerala Story