विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेल्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशाचा कानमंत्र दिला. ‘गव्हर्नमेंट फॉर ग्रोथ’ यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. त्याचवेळी कामाला पर्याय नाही, असे स्पष्ट संकेतही त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत दिले.
योग्य विचार आणि समर्पणातून नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी योजना राबविण्याच्या सूचना मोदींनी केल्या. त्याचवेळी वेळेत कार्यालयात पोहोचण्याचा त्यांनी आग्रह केला. याशिवाय राजकीय शेरेबाजीपासून लांब राहणेच त्यांच्यासाठी फायद्याचे राहील, असेही मोदी मंत्र्यांना म्हणाले. केंद्रीय मंत्रीमंडळातून १२ जुन्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. त्यानंतर नव्याने काही मंत्री सामील करण्यात आले.
जुने मंत्री आज मंत्रिमंडळाचा भाग नसले तरीही त्यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामातून, अनुभवातून आपण शिकण्याची गरज आहे. जुन्या मंत्र्यांचे योगदान बघून नवे लोक त्यापासून शिकवण घेऊ शकतात, असेही मोदी म्हणाले.
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यात अनेक मंत्री वेळेवर कार्यालयात येत नाहीत, अनेकांना आपल्या खात्याबद्दल संपूर्ण माहितीच नाही, काहींनी तर गेल्या वर्षभरात एकही बैठक घेतली नाही, अश्या अनेक बाबी पुढे आल्या. जुन्या मंत्रिमंडळातून काहींची गच्छंती त्याच कारणाने झाली आहे, असेही सांगितले जाते. या सर्व दुर्गुणांपासून लांब राहण्याचा सल्ला त्यांनी नव्या मंत्र्यांना दिला.
जनजागृती करा
कोरोनाचा प्रकोप कमी होताच बाजारपेठा आणि पर्यटनस्थळांवर गर्दी वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. अशात जनजागृती करून काळजी घेण्याचे आवाहन लोकांना करावे, अशी सूचना मोदींनी केली.