वाराणसी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमव्ही गंगा विलास या जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाला आहे. भारतात रिव्हर क्रूझ पर्यटनाचे नवे युग सुरु झाले आहे. ही लक्झरी क्रूझ भारतातील ५ राज्ये आणि बांगलादेश मधील २७ नद्यांमधून ३२०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास करेल. या सेवेच्या प्रारंभानंतर रिव्हर क्रूझची आजवर वापरात न आलेली प्रचंड क्षमता खुली होणार आहे.
अशी आहेत क्रूझची वैशिष्ट्ये
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, देशातील सर्वोत्कृष्ट सेवा जगासमोर आणण्यासाठी एमव्ही गंगा विलास क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या ५१ दिवसांच्या प्रवास नियोजनात ही रिव्हर क्रुझ जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदीचे घाट यासोबतच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह ५० पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. एमव्ही गंगा विलास क्रूझ ६२ मीटर लांब, १२ मीटर रुंद आणि १.४ मीटरच्या ड्राफ्टसह आरामदायी प्रवास करते. यात तीन डेक आणि ३६ पर्यटक क्षमतेचे १८ सुइट्स आहेत. या सुइट्समध्ये पर्यटकांना एक संस्मरणीय आणि विलासी अनुभव देणाऱ्या सर्व सुविधा आहेत. एमव्ही गंगा विलासच्या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील ३२ पर्यटक वाराणसी ते दिब्रुगड प्रवासाचा आनंद लुटतील. दिब्रुगडमध्ये एमव्ही गंगा विलासच्या आगमनाची अपेक्षित तारीख १ मार्च २०२३ आहे.
या मिळतील सुविधा
‘एमव्ही गंगा विलास’ ही क्रूझ तब्बल ६२.५ मीटर लांब आणि १२.८ मीटर रुंद आहे. ही क्रूझ नदीतून १० ते १२ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करते. तसेच या क्रूझमध्ये इंधनाची ४० हजार लिटर आणि पाण्याची ६० हजार लिटरची टाकी आहे. या क्रूझमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. त्यात रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंज आदींचा समावेश आहे. तीन डेक आणि ३६ प्रवासी राहू शकतील असे आलिशान १८ सूट आहेत. मेन डेकवरील ४० सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे. तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल आहेत. एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम आदी सुविधा क्रूझमध्ये आहेत.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1613016684029415424?s=20&t=pApX29vqlDTnF-j2yiVdrw
या ठिकाणांना भेटी
भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी थांबणार असून त्यासोबतच भारताच्या समृद्ध वारश्याचे दर्शन होईल अशा पद्धतीने एमव्ही गंगा विलासच्या प्रवासाची रूपरेषा आखण्यात आली आहे. ही क्रुझ वाराणसीतील प्रसिद्ध “गंगा आरती” पासून ते बौद्ध धर्मासाठी अत्यंत आदराचे ठिकाण असलेल्या सारनाथचे दर्शन घडवेल. क्रुझ आपल्या प्रवासात तांत्रिक विधीसाठी प्रसिद्ध असलेल्या मायॉन्ग आणि मजुली या सर्वात मोठ्या नदी बेटाला भेट देईल. सोबतच आसाममधील वैष्णव पंथीयांचे सांस्कृतिक केंद्रालाही भेट दिली जाईल. बिहार स्कूल ऑफ योगा आणि विक्रमशिला विद्यापीठाला देखील प्रवासी भेट देतील. या भेटीमुळे प्रवाशांना भारताचा अध्यात्म आणि ज्ञानाचा समृद्ध वारसा जवळून पाहता येईल.
रोजगाराच्या संधी
समुद्रपर्यटन आणि रॉयल बंगाल टायगर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बंगालच्या उपसागरातील सुंदरबनच्या जैवविविधतेने नटलेल्या समृद्ध जागतिक वारसा स्थळांवरून तसेच एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातूनही ही क्रुझ प्रवास करेल. देशात रिव्हर क्रूझ पर्यटन विकसित करण्याची गरज सोनोवाल यांनी अधोरेखित केली. या क्षेत्राच्या पर्यटन विकासामुळे दुर्गम भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.
एवढे आहे भाडे
एका दिवसासाठी प्रत्येक प्रवाशाला तब्बल ५० हजार रुपयांचे तिकीट आहे. असे असले तरी पुढील दोन वर्षांचे बुकींग फुल्ल झाल्याचे सांगण्यात आले आहे.
https://twitter.com/mygovindia/status/1613743997121613824?s=20&t=pApX29vqlDTnF-j2yiVdrw
PM Modi Inaugurates MV Ganga Vilas worlds Longest River Cruise Features