इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या तमिळनाडू युनिटकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच या प्रसंगी इतर योजनाही राबवण्यात येणार असून, ७२० किलोग्रॅम मासेही वाटण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत तमिळनाडूमध्ये अंगठी आणि मासे वाटप होणार आहे. याविषयी तमिळनाडू युनिटकडून माहिती देण्यात आली आहे. याविषयी मत्स्यव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगण म्हणाले, “आम्ही अंगठी वाटपासाठी चेन्नईमधील आरएसआरएम या सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येईल. ही प्रत्येक अंगठी २ ग्रॅमची असणार आहे. या माध्यमातून नवजात आम्ही स्वागत करणार आहोत. या रुग्णालयात १७ सप्टेंबरला १० ते १५ बालकांचा जन्म होऊ शकतो.”
७२० किलो मासे वाटप
पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये ७२० किलो मासेवाटपदेखील करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. मत्स्य विक्रीय प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व पंतप्रधान मस्त्य संपदा योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी ७२ वर्षांचे होणार असल्याने ७२० हा आकडा निवडला असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री मुरुगन यांनी म्हणले आहे.
दिल्लीमध्ये विशेष उपक्रम
दिल्लीमध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच झोपडपट्टीतील लोकांसाठी विशेष शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून, १८ ऑक्टोबरला ही शर्यत होणार आहे.
PM Modi Birthday Child Gold Ring Gift