इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अबुजाः पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात रविवारी आफ्रिकन देश नायजेरियाला पोहोचले. पंतप्रधान मोदी यांचे विमान अबुजा, नायजेरिया येथे उतरले. तेथे त्यांचे नायजेरियन सरकारचे मंत्री न्यासोम इझेनवो वाइके यांनी जोरदार स्वागत केले.
नायजेरिया सरकारच्या मंत्र्याने आदरार्थी म्हणून अबुजा शहराच्या चाव्या पंतप्रधान मोदी यांना दिल्या. खरे तर ही चावी नायजेरियातील जनतेने पंतप्रधान मोदींप्रती दाखविलेल्या आदर आणि विश्वासाचे प्रतीक आहे. यानंतर आता नायजेरिया मोदी यांना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’या पुरस्काराने सन्मानित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोदी यांना प्रदान करण्यात येणारा हा १७ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल. राणी एलिझाबेथ या एकमेव परदेशी मान्यवर आहेत, ज्यांना १९६९ मध्ये हा ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ हा पुरस्कार मिळाला आहे. यानंतर मोदी हे दुसरे विदेशी असणार आहेत, ज्यांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे.
मोदी यांचा पश्चिम आफ्रिकन प्रदेशाचा पहिला दौरा आहे. ते सध्या नायजेरिया, ब्राझील आणि गयाना येथे थांबलेल्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहे. नायजेरियाच्या दौऱ्यानंतर मोदी यांचा ब्राझीलचा दौरा आहे. या देशांसोबत भारताचे राजनैतिक आणि आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.