नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतविरोधी कारवायांना खुलेआम प्रदर्शन करण्याची मुभा दिल्याबद्दल भारत सरकारने कॅनडा सरकारला चांगलेच ठणकावले आहे. कॅनडामध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे दृष्य उभे करणारा चित्ररथ फिरवण्यात आला. यावर भारताने संताप व्यक्त केला आहे.
भारतातील राजकीय पक्षांमध्ये असलेले वैर केवळ राजकीय आणि वैचारिक वैर आहे. पण देशाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांच्या विरोधात सगळे एकत्र आहेत, असेच सांगण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे दृष्य दाखविणारा चित्ररथ रस्त्यावरून फिरवला. या रथावर इंदिरा गांधी यांचे दोन सुरक्षारक्षक दिसतात. हेच सुरक्षारक्षक त्यांचे मारेकरी होते. तर दुसऱ्या बाजुला रक्ताने माखलेल्या पांढऱ्या साडीमध्ये इंदिरा गांधी दाखविण्यात आल्या आहेत.
काँग्रेसने यावर प्रचंड नाराजी व्यक्त करून भारत सरकारला दखल देण्याचे आवाहन केले. काँग्रेसनेते मिलींद देवरा यांनी या रॅलीचा व्हिडियो सोशल मिडियावर ट्विट करून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना लक्ष घालण्याची विनंती केली. ट्विटरवर भारतातील सर्व विचारांच्या, सर्व पक्षातील समर्थकांच्या बाजुने कॅनडातील या प्रकारावर जोरदार हल्ला चढवण्यात आला.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला आहे. खलिस्तान्यांनी शीख हल्लेखोरांचे उदात्तीकरण करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
काय म्हणाले परराष्ट्र मंत्री?
कॅनडासाठी हे चित्र चांगले नाही. विशेषतः द्विपक्षीय संबंधांसाठी तर मुळीच नाही. कॅनडासारख्या देशाने आपल्या भूमीतून भारतविरोधी घटकांना कारवाया करण्याची मुभा देणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे केवळ तेथील मतपेटीचे राजकारण असू शकते, अशी टीका केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे.
उच्चायुक्तांनी नोंदवला निषेध
कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरॉन मॅकाय यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येचा कॅनडामध्ये उत्सव साजरा झाल्याच्या वृत्तावर त्यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. द्वेष आणि हिंसाचाराचे उदात्तीकरण याला कॅनडात मुळीच स्थान नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
PM Indira Gandhi Assassination Tableau Canada Khalistan