मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे मुख्यमंत्री कुटुंबाला कधी वेळ देत असतील, त्यांना कधी फिरायला घेऊन जात असतील, असे असंख्य प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडत असतात. पण वेळ काढला तर मुख्यमंत्र्यांनाही कुटुंबासोबत फिरायला जाणे शक्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या अशाच एका ‘फॅमिली टूर’वर आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फिरायला गेले आहेत, याची माहिती त्यांच्या कार्यालयाला सुद्धा नव्हती, असे बोलले जात आहे. परंतु, वास्तवात माहिती नव्हती? की माहिती होऊ न देण्याच्या सूचना होत्या? असेही प्रश्न निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा खासगी टूर असून त्याबद्दल सरकारी व राजकीय चर्चा होऊ नये, याची काळजी घेतली गेली असावी. मात्र, हल्ली ‘सूत्र’ एवढी दमदार असतात की काहीही लपत नाही. त्यामुळे अगदी दुसऱ्याच तासाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कुटुंबासोबत काश्मीरमध्येफिरायला गेले आहेत, याची माहिती सर्वत्र पसरली.
मुख्यमंत्री सुटीवर आहेत, पण त्याची माहिती अधिकृत दिली नसल्याने सारा घोळ झाला, असे शेवटी माध्यमांच्या लक्षात आले. गेल्यावर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड करून भाजपसोबत हात मिळवले. त्यानंतर सरकार स्थापन झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या घटनेला येत्या २० जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण वर्ष नवीन कारभार समजून घेण्यात, राजकीय घडामोडींचा सामना करण्यात आणि न्यायालयाच्या निर्णयांवर लक्ष ठेवण्यात गेले. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत काश्मीर पर्यटनावर जाण्याचा निर्णय घेतला असावा.
तिथेही चर्चा करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या कुटुंबासोबत काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. गुरुवारी त्यांनी वैष्णोदेवीचे दर्शन सुद्धा घेतले. पण काहीतरी काम केल्याशिवाय मन रमणार नाही, या विचाराने ते काश्मीरमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे कळते.
सुट्यांची मालिका
अगदी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे तीन दिवस सातारा येथे आपल्या गावी गेले होते. त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्यांची सुट्यांची मालिका सुरू असल्याची चर्चा होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब या आपल्या गावी असतानाही त्यांनी कामे सुरूच ठेवली होती, हे विशेष.
Chief Minister Eknath Shinde 3 Days Leave