पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने आरोग्य विभागाने पिंपळगाव बसवंत शहरात वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अल्पेश पारख यांच्या नेतृत्वाखालील शहर भाजपच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश धनवटे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटल्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ४५ वय वर्षापुढील वयोवृद्ध महिला पुरुष यांना उन्हात उभे राहून सुद्धा लस मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाने पिंपळगाव बसवंत शहरातील सर्व वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू केल्यास गर्दी टाळण्यास मदत होईल. प्रत्येक नागरिकांना वेळेवर नियोजनबद्ध लसीकरणाची लाभ होणार असल्याने प्रशासनाने केंद्र वाढविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनप्रसंगी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अल्पेश पारख,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत घोडके, बापूसाहेब पाटील, शहराध्यक्ष गोविंद कुशारे, चिंधु काळे, मदन घुमरे, आदी उपस्थित होते.