पिंपळगाव बसवंत – निफाड तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी, कामगारांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला रानवड सहकारी साखर कारखाना स्व अशोकराव बनकर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या समवेत रानवड साखर कारखान्याला भेट देत पाहणी केली.
स्व अशोकराव बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून १५ वर्षे भाडेतत्त्वावर रासाकाची सूत्रे हातात घेत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आमदार दिलीप बनकरांनी कारखानदारी सुरू करण्याचा दिलेला शब्द रासाकाच्या माध्यमातून खरा ठरणार असून येत्या ऑक्टोबर महिन्यात रानवड कारखाना प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने शेतकरी कामगारवर्गाला न्याय मिळणार आहे.
याप्रसंगीसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, व्हा.चेअरमन गफ्फार शेख, कार्यकारी संचालक अरविंद जाधव, बाळासाहेब बनकर, बाजार समितीचे संचालक सुरेश खोडे, चंद्रकांत राका, विलास निळकंठ, उमेदमल जैन,अविनाश बनकर, कारखान्याचे अवसायक राजेंद्र निकम, कार्यकारी संचालक सुनील दळवी आदी उपस्थित होते.
बाजार समितीला भेट…..
आशिया खंडात क्रमांक एकची बाजार समिती असा नावलौकिक प्राप्त पिंपळगाव बाजार समितीच्या आवराला देखील राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भेट देत पाहणी करत आमदार दिलीप बनकर यांच्या कामाचे कौतुक केले.
मदतीचे आश्वासन…….
राज्यात प्रथमच सहकारी पतसंस्थेने साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेतल्याचे हे एकमेव उदाहरण असून याबद्दल त्यांनी आमदार दिलीप बनकर व पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी कौतुक केले व येत्या गळीत हंगामात सदरचा कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून सर्वोत्तोपारी मदत करण्याचे आश्वासन यावेळी आमदार दिलीप बनकर व संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळास दिले.