पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – सध्या गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात घसघशीत वाढ झाल्याने टोमॅटो उत्पादकांना काही अंशी दिलासा लाभत आहे. तर दुसरीकडे पिंपळगाव बाजार समितीत एका व्यापाऱ्याकडून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची वजनात लूट केल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओतून समोर आल्याने वजनात लूट करणाऱ्या या व्यापाऱ्यावर बाजारसमिती नेमकी काय कारवाई करते हे पहाणे आता औसुक्याचे ठरणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातसह भागात यंदा टोमॅटोचे विक्रमी लागवड झाल्याने यंदाच्या हंगामात उत्पादकांना सुरवातीपासूनच बाजारभावाचा फटका बसला. उत्पादन खर्च देखील वसूल न झाल्याने कुठे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले तर कुठे मोफत वाटत उत्पादकांकडून नाराजी व्यक्त झाली.सध्यस्थीतीत टोमॅटोच्या मागणी वाढल्याने बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला चांगला दर लाभत आहे.
दुसरीकडे पिंपळगाव बाजार समितीत एका व्यापाऱ्याकडून टोमॅटो उत्पादकाची वजन काट्याला खालून दगड लावून लूट होत असल्याचा प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे.सदर शेतकऱ्याने घरूनच टोमॅटोचे २०किलोचे कॅरेट माल मोजून आणला होता. बाजारसमितीत व्यापाऱ्याचा काट्यावर माल वजनास ठेवला असता त्याने दोन ते तीन किलो टोमॅटो काढल्याने शेतकऱ्यास संशय आल्याने त्याने व्यापाऱ्याचा काटा उलटा केला असताना त्यास दगड लावून लूटमार होत असल्याचे उघड झाले. वजनात लूटमार करणाऱ्या व्यापाऱ्यावर बाजारसमितीकडून नेमकी काय कारवाई होते याकडे टोमॅटो उत्पादकांच्या नजरा लागून आहे.
पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची वजनात लूट झाल्याचा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. सदर आडतदार व व्यापाऱ्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– बाळासाहेब बाजारे, सचिव, पिंपळगाव ब. बाजार समिती
बघा व्हायरल व्हिडिओ