नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक शहरालगत पिंपळगाव बसवंत येथे असलेला टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा टोल नाका त्वरीत बंद करावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मनसेने प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (NH3) नाशिक शहरापासून 30 किमी अंतरावर पिंपळगाव-बसवंत येथे पीएनजी टोलवे प्रायव्हेट लिमिटेड द्वारे बीओटी (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर) तत्वावर टोल नाका बांधण्यात आला आहे. हा टोल प्लाझा राज्यात प्रथम क्रमांकाचा वादग्रस्त टोल नाका बनला आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे त्रस्त असलेल्या प्रवाश्यांना येथील टोलनाका कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागण्याचा, दादागिरीचा त्रास विनाकारण सहन करावा लागत आहे.
घोटी ते चांदवड या अवघ्या ७० किमी अंतरावर ०३ टोल नाके आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत घोषणा केली आहे की, ६० किमी अंतरापेक्षा कमी अंतरावरील टोल नाके बंद करण्यात येतील. त्यामुळे शासन नियमाप्रमाणे हा टोल नाका तात्काळ कायम स्वरुपी बंद करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्यास दिलेल्या निवेदनानुसार आपण काय कारवाई केली त्याची माहिती दोन दिवसांत लेखी स्वरुपात कळवावी, अन्यथा हा टोल नाका तात्काळ कायम स्वरुपी बंद करण्याबाबत तीव्र स्वरुपाचे जन आंदोलन उभारण्यात येईल. याची सर्व जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावर मा. प्रकल्प अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी या बाबत तात्काळ योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे, सहकार सेना प्रदेश सचिव राकेश परदेशी, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष निकीतेश धाकराव, शहर संघटक अमित गांगुर्डे, मनविसे जिल्हाध्यक्ष मनोज गोवर्धने, रस्ते आस्थापना शहर संघटक विजय आहिरे, मनविसे शहर संघटक ललित वाघ, अक्षय कोंबडे, मेघराज नवले, शाखा अध्यक्ष पंकज दातीर हे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Pimpalgaon Baswant Toll Naka MNS Threat