नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या निवडणुकीतील मतपत्रिका नाशिक जिल्ह्यातून चोरी झाल्याचा प्रकार पोलिसांच्या मदतीने उघडकिस आणल्यानंतर तब्बल ९ महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय खाडगीर याप्रकरणी न्यायालयीन लढा देत होते, तत्पूर्वीच हा गुन्हा दाखल झाल्याने मेडिकल क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलची निवडणूक प्रक्रिया संपूर्ण राज्यात गेल्यावर्षी २० फेब्रुवारी २०२२ ला राबविण्यात आली होती. फार्मसी कौन्सिलद्वारे मतदारांना पोस्टाद्वारे बॅलेट पेपर पोहोच केले जात होते. दिनांक २३ मे २०२२ ते १७ जुन २०२२ मध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, पोस्ट ऑफिसमधून प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांचे बॅलेट पेपर परस्पर गायब करत असल्याचा प्रकार मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर यांनी उघडकिस आणला होता. सिन्नर पोलिसांनी छापा टाकून सिन्नर येथील विविध मेडिकल मधून बॅलेट पेपर हस्तगत केले होते. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार निवडणूक निर्णय अधिकारी असणे गरजेचे असल्याचे सांगत सिन्नर पोलिसांनी हात झटकले होते. या निवडणुकीची गांभीर्याने दखल घेत अशाप्रकारे मतपत्रिका गायब करणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय खाडगीर यांनी न्यायालयीन लढा सुरू केला होता. न्यायालयीन निकाल येण्यापूर्वीच अखेर नऊ महिन्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद पाटील यांनी सिन्नर पोलीस ठाणे गाठत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकारणी भादवी १७१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. आवारी यांनी दिली.
निवडणुक प्रक्रियेत प्रचंड गौडबंगाल
फार्मसी कौन्सिल निवडणूक प्रक्रियेत प्रचंड गौडबंगाल दडलेले आहे. ही एवढीच एक गोष्ट समोर आल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या उघडकिस आलेल्या नाही. बहुतांश फार्मसीसला मतपत्रिकाच मिळालेल्या नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा उशीर का लावला ? हे देखील एक मोठे गौडबंगाल आहे.
– धनंजय खाडगीर, प्रतिस्पर्धी उमेदवार