नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या आणखी एका कार्यकर्त्याला नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. यापूर्वी मालेगावमधून ५ जणांना एटीएसने जेरबंद केले आहे. देशविघातक कारवाया करणे, समाजात अशांतता निर्माण करणे या आरोपांखाली त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एटीएसच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यात पीएफआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा व्हॉटसअॅप ग्रुप होता. त्यात त्यांचे संवेदनशील चॅट झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांनी देशभरातच पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड मोहिम राबविली. त्यात मालेगावमधून मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, मालेगाव), पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८), रझी अहमद खान (३१, रा. दोन्ही रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली. हे सर्वजण सध्या कोठडीत आहेत. त्यातच आता एटीएसने उनैस उमर खय्याम पटेल (३१, रा. जळगाव) याला अटक केली आहे. उनैस याने अटकेतील पीएफआय पदाधिकाऱ्यांचे मोबाइल आणि लॅपटॉप फॉरमॅट केल्याचा संशय आहे. उनैसला ४ नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटकेत असलेल्या सर्वांचाच एटीएसने अतिशय कसून तपास केला आहे. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवणे, राम मंदिराच्या जागी बाबरी मशिद उभारणे असे कारस्थान पीएफआयच्यावतीने रचले जात होते. सध्या अटक केलेल्या उनैस याचा वसीम शेख याच्यासोबत संपर्क आला होता. त्याच्या मार्फत उनैसने कय्युम शेख याचा मोबाईल फॉरमॅट करून दिला. शिवाय या सर्व आरोपींचा क्रिएटीव्ह माईंड्स नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप होता. उनैसच्या मोबाइलमध्ये दोन ऑडीओ क्लीप एटीएसला सापडल्या आहेत. या क्लिपमधील संभाषण अतिशय आक्षेपार्ह असल्याचे एटीएसच्या निदर्शनास आले आहे. त्याआधारेच उनैसला अटक करण्यात आली आहे. उनैस याने संशयितांचा मोबाइल का फाॅरमॅट केला, कसा केला, त्यात कोणती संवेदनशील माहिती होती, हे फॉरमॅट करण्यास कुणी सांगितले होते, उनैस कुणाकुणाच्या संपर्कात होता, आदी बाबींची चौकशी सध्या एटीएसकडून केली जात आहे.
PFI Suspect Arrested from Jalgaon WhatsApp Group
ATS Crime