विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना काळात जीवनाच्या अनिश्चिततेची भीती इतकी वाढली आहे की गेल्या दीड महिन्यात वकील आणि कायदेविषयक संस्थांकडे मृत्यूपत्र बनविण्यासाठी लोकांची गर्दी अचानक वाढली आहे. यामध्ये ३० ते ४५ वर्षांचे तरुण व्यावसायिक आपली स्थावर मालमत्ता आणि इतर संपत्तीच्या वितरणासाठी मृत्यूपत्र लिहून घेत आहेत. त्यांच्यापश्चात कुटुंबीयांत संपत्तीवरून वितुष्ट निर्माण होऊ नये यासाठी संबंधित लोक काळजी घेत आहेत.
कोविड लसीची अनिश्चितता, लॉकडाउन आणि कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता लोकांमध्ये चिंता वाढवत आहे. तीस वर्ष वयाची इंटिरियर डिझायनर असो, किंवा ३२ वर्षाचा कॉर्पोरेट एग्झिक्युटिव्ह किंवा ४० वर्षांचा रेस्टॉरंट मालक असो किंवा ४५ वर्षांचा गुंतवणूकदार असो. सर्व मृत्यूपत्र बनविण्यासाठी वकिलांकडे गर्दी करत आहेत.
एक वकील सांगतात, मृत्यूपत्र बनविण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे. आधी ५५-६० वर्षांचे गंभीर आजार झालेले लोक मृत्यूपत्र तयार करून घेत होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत तरुण आणि कोणताही आजार नसलेले लोक मृत्यूपत्र बनवून घेण्यास आग्रही आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली अनिश्चितता हेच मुख्य कारण असू शकते.
सर्वोच्च न्यायालयाचे एक वकील सांगतात, बहुतांश मृत्यूपत्रे परस्परांच्या संमतीने तयार केली जात आहेत. त्यामध्ये पती किंवा पत्नी एकमेकांना आपली संपत्ती देत आहेत. तसेच पुढील पिढीला ही संपत्ती मिळेल अशीही व्यवस्था केली जात आहे. घरात पती आणि पत्नी दोघेही कमवत असल्यामुळे मिळकत वाढली आहे. ४० वर्षांचे होईपर्यंत तरुण व्यावसायिक स्थावर मालमत्ता आणि शेअर बाजारातून चांगलेच पैसे कमावत आहेत. याच संपत्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी मृत्यूपत्र बनविण्याची इच्छा वाढू लागली आहे.
काय आहेत नियम
भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ च्या कलम ५९ अंतर्गत मृत्यूपत्र तयार केले जातात. स्वतः कमावलेल्या संपत्तीचेच मृत्यूपत्र तयार केले जाऊ शकतात. वडिलांच्या संपत्तीचे मृत्यूपत्र तयार केले जाऊ शकत नाही. तयार करणार कधीही मृत्यूपत्रात बदल करू शकतो.
मृत्यूपत्र बनविण्याची सोपी पद्धत आहे. यासाठी दोन साक्षीदार हवेत. ते कुटुंबातील सदस्य असू शकतात परंतु संपत्तीचे लाभार्थी नसावेत. मृत्यूपत्र तयार करताना स्वाक्षरी करण्यासाठी संबंधितांना उपस्थित राहणे आवश्यक आहे.