बीजिंग (चीन) – संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भावाला चीनमधूनच सुरुवात झाल्याचे आरोप झाले आहेत. अमेरिकेसह इतर देशांनी तसे पुरावेच असल्याचे जाहीर केले आहे. परंतु विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हाच अंतिम उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. याच पृष्ठभूमीवर जगभरात लसीकरणाने वेग घेतला आहे. परंतु चीनने लसीकरणात चाचपडत सुरुवात केल्यानंतर आज त्यांचा आकडा ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावतील. लसीकरण विलंबाने सुरू झाल्यानंतरही लसीकरणात चीन सर्वात पुढे जात असल्याचे चित्र आहे. काही दिवसात चीनमध्ये एक अब्ज लोकांचे लसीकरण पूर्ण होणार आहे. इतर देशांच्या तुलनेत हा आकडा खूप मोठा आहे.
चीनमध्ये बुधवारपर्यंत ९४.५ कोटी लोकांचे लसीकरण झालेले आहे. अमेरिकेच्या तुलनेत हा आकडा तीनपट आहे. जगभरात झालेल्या लसीकरणात एकट्या चीनमध्ये ४० टक्के लसीकरण झाले आहे. जगात आतापर्यंत २.५ अब्ज लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. चीनमध्ये मंगळवारी दोन कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचा हाच वेग कायम राहिल्यास चीनमध्ये एक अब्ज लोकांचे लसीकरण झालेले असेल.
मे मधील लसीकरण
चीनमध्ये लसीकरण अभियानात आलेला वेग खूपच आश्चर्यचकित करणारा आहे. कारण त्यांचे लसीकरण अभियान खूपच धिम्या गतीने सुरू झाले होते. चीनने २७ मार्चपर्यंत १० लाख लसीकरण करण्यात आले. अमेरिकेने दोन आठवड्यापूर्वी इतक्यात लोकांचे लसीकरण केले होते. परंतु मे महिन्यात लसीकरणाचा वेग खूपच वाढला. चीनच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, फक्त मे महिन्यातच ५० कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.
म्हणून लस घेण्याकडे कल
चीनमध्ये १.४ अब्ज लोकसंख्येचे लसीकरण करणे आव्हानात्मक काम होते. कोरोना विषाणूस रोखण्यास यश मिळाल्यामुळे चीनमधील लोकांनी सुरुवातीला लसीकरणात कमी रस दाखविला.
स्थानिक लसीकरणाशी संबंधित सुरक्षा घोटाळ्याचा इतिहास ताजा असल्याने लोकांच्या मनात संकोच निर्माण झाला होता. परंतु उत्तर अनहुई आणि लियाओनिंग प्रांतात तसेच दक्षिण ग्वांगडोंगसह अनेक भागात नुकताच संसर्ग वाढल्यामुळे शंका निर्माण झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून लोक लसीकरणासाठी गर्दी करू लागले. तसेच चीनमध्ये सक्ती करण्यात आल्याने लोक लस घेण्यास तयार झाले.
आकर्षक ऑफर्स
चीनमध्ये मोठी शहरे आणि छोट्या गावांमध्ये सर्वांचे लसीकरण करून घेण्यासाठी मोठे अभियान राबविण्यात येत आहे. लोकांचे लसीकरण करून घेण्यासाठी सरकारी कर्मचार्यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. राज्यांच्या सरकारी कंपन्यांमध्ये कर्मचार्यांना लस घेण्याचा आग्रह केला जात आहे. तसेच लसीकरणाच्या शिबिरांमध्ये लोकांसाठी आकर्षक खरेदी व्हाउचर, मोफत किराणा आणि आईस्क्रिम देण्याच्या ऑफर दिल्या जात आहेत.