मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सर्वांच्या ओठी दोनच नावे होती. एकतर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार. या दोघांपैकीच कुणीतरी संजय राऊत यांना कारागृहातून बाहेर काढले, असा सर्वसाधारण समज होता. पण प्रत्यक्षात दुसरीच व्यक्ती सारे प्रयत्न करत होती आणि राऊत यांच्यासह पवार व ठाकरेही त्याच व्यक्तीला श्रेय देतात.
संजय राऊत यांना कथित पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केली होती. ते १०४ दिवस तुरुंगात होते. २०१९ ला युती तुटल्यापासून संजय राऊत यांनी ज्याप्रकारे भाजपला अंगावर घेतले, त्यानुसार राऊत यांची लवकर सुटका होणार नाही, असा कयास साऱ्यांनीच बांधला होता. पण आतापर्यंत जेवढ्या राजकीय नेत्यांना ईडीने अटक केली आहे, त्यांच्या तुलनेत राऊत लवकर सुटले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. आणि त्याचे श्रेय उद्धव ठाकरे व शरद पवार यांना देण्यात आले. मात्र संजय राऊत यांनी तुरुंगातून बाहेर पडण्याचे श्रेय त्यांचा भाऊ सुनील राऊत यांना दिले आहे.
सुनील राऊत यांनी कायदेशीर लढाई लढून आपल्याला बाहेर काढल्याचे संजय राऊत म्हणाले. ‘मी साडेतीन महिने तुरुंगात राहिलो. त्यावेळी सुनील मला तुरुंगातून बाहेर काढणार, याची मला शंभर टक्के खात्री होती. सुनील बाहेर काय करतोय, याची माहिती मी घेत असे. त्याची मेहनत मी पाहत होतो. ज्या पद्धतीने सुनील बाहेर कायदेशीर लढाई लढत होता, ती मलाही कधी जमली नसती,’ असे संजय राऊत म्हणाले.
सुडबुद्धीचा आरोप
सक्तवसुली संचालनालयाने संजय राऊत यांना अटक केली तेव्हा ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कथित पत्राचाळ घोटाळ्यात जवळपास १०४ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता. संजय राऊत यांची लवकर सुटका होणार नाही, अशी शक्यताही त्यावेळी वर्तवण्यात आली होती.
मी निष्कलंक
आतापर्यंत देशभरात ईडीकडून केलेल्या कारवायांमध्ये फक्त तीन महिन्यांत तुरुंगातून बाहेर आलेला मी एकमेव आहे. मी निष्कलंकपणे बाहेर आलोय. न्यायालयाने माझी अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.