विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या १९ तारखेपासून सुरु होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नुकतीच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेत तयारीचा आढावा घेतला. यावेळी दोन्ही सभागृहांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. १३ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या २० बैठका होणार आहेत.
अधिवेशनाच्या आधी दोन्ही सभागृहातील खासदारांच्या तसेच दोन्ही सभागृहाच्या सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांची लसीकरणाची प्रकिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. कोरोनाकाळात होत असलेले संसदेचे हे चौथे अधिवेशन आहे. याआधी कोरोना नियमांमुळे दोन्ही सभागृहांचे अधिवेशन एकाच वेळी न घेता वेगवेगळे घेतले जात होते.