मुंबई – माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अखेर राज्य सरकारने कठोर कारवाई केली आहे. सिंह यांच्या आरोपांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावे लागले आहे. तसेच, सध्या ते तुरुंगात आहेत. तर, सिंह हे सध्या मुक्तपणे संचार करीत आहेत. या सर्व प्रकाराची दखल घेत राज्य सरकारने सिंह यांना दणका दिला आहे. सिंह यांचे राज्य सरकारने निलंबन केले आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला. तत्कालिन गृहमंत्री देशमुख हे १०० कोटी रुपये वसूल करीत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर मोठे वादंग निर्माण झाले. सिंह यांची कारकीर्द सुद्धा अतिशय वादग्रस्त आहे. त्याची दखल घेत त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने अतिरीक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. त्याचा अहवाल आल्यानंतर आता राज्य सरकारने कारवाई केली आहे. सिंह यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सिंह यांच्यावर खंडणी आणि अॅट्रॉसिटीचे अनेक गुन्हा दाखल असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.