विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी मंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची ते भेट घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. बीड येथे भाजपच्या ४९ समर्थकांनी राजीनामे दिल्यामुळे त्या अचानक दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीहून परतल्यानंतर येत्या मंगळवारी (१२ जुलै) त्यांनी वरळी येथे आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. त्यात त्या काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंडे यांची दिल्ली वारी सध्या विशेष चर्चेत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना स्थान मिळालेले नाही. डॉ. प्रितम या पंकजा यांच्या भगिनी तर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. डॉ. प्रितम यांना राज्यमंत्रीपद तरी मिळेल, अशी चर्चा होती. संभाव्य यादीत त्यांचे नाव होते, असेही बोलले जात आहे. पण, ऐनवेळी डॉ. प्रितम यांना संधी नाकारण्यात आली. त्यामुळे मुंडे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. तसेच, पंकजा मुंडे या सुद्धा नाखुश असल्याचे सांगितले गेले पण आपण नाराज नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पण, भाजपच्या पदाधिका-यांचे राजीनामासत्र सुरु झाल्यानंतर आता त्या अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. मुंडे यांचे नाराजी नाट्य हा दबावतंत्राचा भाग असल्याचेही बोलले जात आहे. दिल्लीतील बैठकीत काय चर्चा होते, त्या काय निर्णय घेतात आणि समर्थकांच्या बैठकीत या भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.