पंढरपूर – आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. कोरोना काळात गेले दीड वर्ष मंदिरे बंद असल्याने भाविकांना लाडक्या विठुरायाचे दर्शन घेता आले नाही. परंतु निर्बंध शिथिल झाल्यानंतर मंदिरेही खुली करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेसाठी भाविकांना विठुरायाचे २४ तास दर्शन घेता येण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग शनिवारी सायंकाळी प्रथमच धुपारतीनंतर काढण्यात आला. देवाची झोप बंद झाली आहे असा याचा अर्थ होतो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता, मंदिरही खुले राहायचे परंतु भाविकांना प्रवेश नसायचा. कार्तिकी यात्रा होण्याची शक्यता असल्याने २४ नोव्हेंबरपर्यंत भाविकांना २४ तास दर्शन मिळणार आहे.
मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शनिवारी पूजा झाल्यानंतर विठुरायाच्या पाठीला लोड आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला. २४ तास उभे राहून देवाला थकवा जाणवू नये म्हणून देवाच्या पाठीमागे कापसाचा लोड लावण्याची परंपरा आहे. एरवी देवाच्या राजोपचाराला पहाटे चार वाजेपासून सुरूवात होते. रात्री शेजारती झाल्यानंतर मंदिर बंद होते. देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवभरात देवाचे स्नान, नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी या काळातच दर्शन बंद असेल. उर्वरित वेळेत अखंड दर्शन सुरू राहील. यात्रेच्या काळात तासाला अडीच ते तीन हजार भाविक दर्शन घेत असल्याने दिवसभरात लाखो भाविक दर्शन घेतील असा अंदाज आहे.