पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या वारकरी संप्रदायाचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलच्या म्हणजेच विठुरायाच्या दर्शनाची आस समस्त भक्त जणांना लागलेली असते, त्यासाठी दरवर्षी हजारो नव्हे तर लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात. विशेषतः आषाढी – कार्तिकी या वारीसाठी प्रचंड गर्दी होते. दर्शन बारी म्हणजेच दर्शनासाठी लागलेल्या रांगा या गावाबाहेर गोपाळपुराच्याही पुढे जातात. मात्र भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी विठ्ठल मंदिरा लगतच दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. जेणेकरून या ठिकाणी दर्शन घेताना थोडीशी विश्रांती घेता येईल, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र पंढरपुरातील सुमारे ३२ वर्षांपूर्वी उभारलेला हा दर्शन मंडप आता पाडण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र तो पाडण्यात येऊ नये, त्या ऐवजी त्याचा अन्य कामासाठी वापर करावा, अशी मागणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली आहे.
वास्तविक पाहता वारकऱ्यांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या या दर्शन मंडपाचा केवळ पहिलाच मजलाच गेल्या अनेक वर्षापासून उपयोगात येत आहे, याला कारण म्हणजे दर्शन मंडपात सात मजले असून ते चढउतार करणे ज्येष्ठ वारकऱ्यांना वयोमानानुसार शक्य नसते, त्यामुळे सध्या तरी केवळ पहिलाच मजला उपयोगात आणला जात आहे. त्यामुळे अन्य सहा मजले धुळखात पडून आहेत. त्यामुळे ते मजले पाडून तेथे अन्य बांधकाम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र तो दर्शन मंडप पाडण्यास गहीनीनाथ महाराज यांच्यासह अन्य पदाधिकारी व वारकऱ्यांना विरोध आहे.
सन १९८७ मध्ये तत्कालीन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रभाकर देशमुख यांनी या सात मजली दर्शन मंडप उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. सुमारे ३५ हजार भाविकांची क्षमता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दर्शन रांगेसाठी या संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाचा वापर सुरू होता. दरम्यान अपुऱ्या सोयीमुळे हा दर्शन मंडप मागील अनेक दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. काही ठराविक भागाचा दर्शन रांगेसाठी वापर केला जातो आहे.
दरम्यान, आता नव्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात विठ्ठल मंदिरा शेजारी असलेला हा दर्शन मंडप पाडून त्या ठिकाणी पार्किंग आणि मंदिर समितीचे भव्य असे कार्यालय उभारण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीमध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष, वारकरी प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांची एक बैठक सोलापुरात पार पडली. या बैठकीमध्ये दर्शन मंडप पाडण्यासह मंदिर परिसरातील इतर विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी दर्शन मंडप पाडण्यास विरोध दर्शविला आहे.
सदर इमारतीचा सध्या कोणताच उपयोग होत नसल्याने या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने केला आहे. मात्र मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत सांगितले की, आमच्याशी कोणीच बोलणे केले नसल्याने भाविकांच्या पैशातून उभारलेल्या या इमारतीमध्ये सध्याच्या प्रकल्पानुसार बदल करुन हीच इमारत वापरात आणावी, अशी आमची मागणी आहे. याच इमारतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन जे बदल करायचे असतील ते करावेत, मात्र ही इमारत जमीनदोस्त करु नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
पंढरपूर शहर विकासाचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये शहरातील एकूण २४ रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण केले जाणार आहे, तसेच जुना सात मजली दर्शन मंडप पाडणे, भाविकांच्या निवासासाठी ६५ एकर मध्ये नवीन तळ उभारणे, चंद्रभागेच्या दोन्ही तीरावर नवीन घाट बांधणे, संतवाणी नावाचे नवीन रेडिओ स्टेशन उभारणे, पंढरपूर येथे कायमस्वरुपी हेलिपॅड उभारणे, यमाई तलाव आणि दोन उद्यानांचे सुशोभीकरण करणे पंढरपूर येथे नवीन संत नामदेव स्मारक उभारणे, गोपाळपूर परिसर आणि गोपाळकृष्ण मंदिराचा विकास करणे आदी कामांचा समावेश आहे.
विठ्ठल मंदिर आणि परिसर विकास – १५५ कोटी रुपये, पंढरपूरमधील पायाभूत सुविधा – १३३०कोटी रुपये व अन्य कामे असा निधी खर्च होणार आहे. या आराखड्यात विठ्ठल भक्तांच्या दर्शन व्यवस्थेबाबत कोणताच समाधानकारक पर्याय समोर आला नसल्याने भाविकांना पुन्हा तासनतास दर्शन रांगेत तिष्ठत थांबावे लागणार आहे. तसेच आता मंदिर समितीच्या अध्यक्षांनी देखील सात मजली दर्शन मंडप पाडण्यास विरोध केल्याने शासनाला या विकास आराखड्याबाबत पुनर्विचार करावा लागणार आहे.
Pandharpur Temple Darshan Mandap Controversy