रविंद्र धारणे
त्र्यंबकेश्वर – धन्य धन्य निवृतीनाथा, काय माहिमा वर्णवा असे अभंग मुखी गात हातात वारकरी सांप्रदायाच्या पताका, डोक्यावर कळस, तुळसीपात्र घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळकरी, पखवाजवादक व मानाच्या दिंडयासह हजारो वारकऱ्यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जयजयकार करीत आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान केले.
शेकडो वर्षांची पंरापंरा असलेल्या आषाढीवारी साठी संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराज पायी दिंडी सोहळयास साठी कालपासुनच मानाच्या दिंडयासोबत हजारोंच्या संख्येने वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे कोरोनामुळे पायी वारी सोहळा झाला नव्हता. गेली दोन वर्षे नाथांच्या पादुका शिवसाई बसमधुन नेण्यात आली होत्या. मात्र यावर्षी नुकताच निवृत्तीनाथ महाराज मंदिराचा जिर्णोध्दार पूर्ण होऊन मंदिरावर सुवर्ण कलशारोहन संपन्न झाल्याने भाविक आनंदात होते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर पायी वारीला जायला मिळाल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. जवळपास पंचवीस हजारांपेक्षा अधिक भाविक या सोहळ्यात सामील झाले होते. यानिमित्त सकाळी नित्योपचार पूजा झाल्यावर प्रस्थानापूर्वी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुकांची विधिवत पुजा सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लिप्ते, डॅा. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प. मोहन महाराज बेलापुरकर, आदिंच्या हस्ते करण्यात आली. पुजेचे पौरोहित्य वंशपरंपरागत पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, योगेश गोसावी, संच्चिदानंद गोसावी आदींनी केले. यावेळी प्रशासकीय समिती सदस्य मुख्याधिकारी संजय जाधव, पो.नि. संदीप रणदिवे, अॅड. भाऊसाहेब गंभीरे, ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी, ह.भ.प. अनिल महाराज गोसावी यांचेसह विविध दिंड्यांचे मानकरी उपस्थित होते. यानंतर संस्थानच्या वतीने मानाच्या दिंड्यांचा नारळ व कपाळी बुक्का लावून सत्कार करण्यात आला .
यानंतर “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल चा गजर करीत पायी दिंडया सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. पानाफुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृतीनाथांची मुर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या, रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. माजी नगराध्यक्ष सुनिल अडसरे यांच्या बैलजोडीला सातपुर पर्यंत जोडण्याचा मान मिळाला तर सातपुर ते पंढरपुर पर्यंत मुरंबी तालुका ईगतपुरी येथील गजीराम पुंजा यांची बैलजोडी रथाचे सारथ्य करणार आहे. रथाच्या पुढे बैलगाडी मध्ये नगाराखाना ठेवण्यात आला होता. रथाच्या पुढे मानाच्या संत निवृतीनाथ समाधी संस्थान,श्री विठ्ठल मंदीर गावठा दिंङी, सिन्नर. ह.भ.प. श्री. एकनाथ महाराज गोळेसर दिंडी, कुंदेवाडी, सिन्नर, ह.भ.प. मोहन महाराज बेलापुरकर दिंडी, पंढरपुर या ४ दिंडया होत्या तर रथाच्या मागे मानाच्या ३५ दिंड्या अतिशय शिस्तबद्ध रित्या सहभागी झाल्या होत्या. पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी काही क्षण नाथांच्या रथाचे सारथ्य केले. कुशावर्त तिर्थावर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्निक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या मुर्तीस स्नान घालुन पुजा केली. यावेळी महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, माजी विश्वस्त ह.भ.प.पंडीत महाराज कोल्हे, पुंडलिकराव थेटे, योगेश गोसावी, व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुळाणे, मनोज भांगरे आदी उपस्थित होते.
यानंतर पालखीने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने कुच केले. यावेळी भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरासमोर अभंग गायन करण्यात आले. रथाच्या पुढे मोठ्या संख्येने अश्व सहभागी झाले होते. एका अश्वाच्या पाठीवर विठ्ठलाचे चित्र रंगविण्यात आले होते. वाजत गाजत गावाच्या वेशीपर्यंत त्र्यंबककरांनी पायी दिंडीस निरोप दिला. पो. अधिक्षक सचिन पाटील, पोलीस उपअधिक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. संदिप रणदिवे, पो.ऊ.नि. अश्विनी टिळे आणी त्यांच्या सहकार्यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता.
त्र्यंबकेश्वरची पालखी २७ दिवसांत पंढरपूरला पोहोचणार
त्र्यंबकेश्वरची पालखी २७ दिवसांत पंढरपूरला पोहोचणार आहे. दिंडीच्या पायी वाटचालीत जी गावे येतात, त्यांना वारीचे वेळापत्रक पूर्वीच पाठविण्यात आले आहे. पंढरपूरात ९ जुलैला संत निवृत्तीनाथांची पालखी पोहचेल. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास ४५० किलोमीटर आहे. पालखीला जाऊन-येऊन असा एकूण ४९ दिवसांचा कालावधी लागणार आहे. रोज दिवसा साधारण वीस किलोमीटर पायी प्रवास केला जातो. रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपूरात पोहोचते. चार मुक्कामानंतर पंढरपूरवरून पालखी त्र्यंबकेश्वरकडे परत निघेल. १८ दिवसांचा पायी प्रवास करून ३० जुलैला पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परत दाखल होईल. त्र्यंबकेश्वर, सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.