इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विंटर ऑलिम्पिकचा वापर करून राजकीय प्रभाव वाढवण्याचाच एक भाग म्हणून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बिजींगमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रजेज डुडा यांची भेट घेतली. या वेळी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. परंतु पाकिस्तानला कोणतेही नवे कर्ज देण्याबाबत चीन उत्सुक नसल्याचे दिसून आले.
यादरम्यान चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)च्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या कार्यावर चर्चा झाली. सीपीईसीच्या पहिल्या टप्प्यातील अनेक कार्य अद्याप पूर्ण झालेले नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून हे काम बंद पडले आहे. चीनने गुंतवणूक केलेल्या निधीचे व्याजही पाकिस्तान फेडू शकत नाहीये. या भेटीदरम्यान, जिनपिंग म्हणाले, की चीन आणि पाकिस्तानचे धोरणात्मक सहकार्य जगभरात बदलाचा घटक ठरेल. चीन आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पूर्णपणे न्याय आणि पारदर्शकता ठेवण्याची काळजी घेतो. पाकिस्तानसोबतही चीनचे असेच संबंध आहेत. दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांसह इतर आंतरराष्ट्रीय मंचावर सोबत काम करणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, इम्रान खान यांनी जिनपिंग यांच्याकडे तीन अब्ज डॉलरचे कर्ज मागितले आहे. मात्र आधीपासूनच चीनच्या कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आणखी कर्ज मिळण्याचे आश्वासन अद्याप मिळाले नाही. पोलंड हा नाटो या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्य सहकार्य गटाचा सदस्य आहे. तिथे अमेरिकी सैन्य तैनात आहे. डुडा हे युरोपीय युनियनमधील पोलंडचे असे एकमेव नेते आहेत, जे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली विंटर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बहिष्काराकडे दुर्लक्ष करून बीजिंगमध्ये पोहोचले आहेत. जिनपिंग यांनी डुडा यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधावर सविस्तर चर्चा केली. पोलंडच नव्हे, तर हंगेरी आणि सर्बिया हे युरोपीय देशही चीनकडे झुकले आहेत.