नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आलेल्या तालिबानचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी किती घट्ट संबंध आहेत याचे पुरावे हळूहळू जगासमोर येऊ लागले आहेत. नवीन तालिबान सरकारमधील उपपंतप्रधान मुल्ला अब्दूल गनी बरादरचे पाकिस्तानचे पासपोर्ट आणि ओळखपत्र समोर आले आहे. दोन्ही कागदपत्रांवर त्याचे नाव मोहम्मद आरिफ आघा असे नोंदविण्यात आले आहे. यावरूवन काबूलवर ताबा मिळविण्याच्या मोहिमेत आयएसआयकडून तालिबानला मदत करण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात तालिबानचे सत्तेत पुनरागमन करण्यास पाकिस्ताकडून जोरदार मदत मिळालेली आहे, हे सिद्ध होत आहे.
मुल्ला बरादरचे पाकिस्तानचे ओळखपत्र (अनुक्रमांक संख्या ४२२०१-५२९२४६०-५) दहा जुलै २१०४ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये त्याचे जन्माचे वर्ष १९६३ नोंदविण्यात आले आहे. तसेच सय्यद एम. नजीर आघा असे वडिलांचे नाव नोंदविले आहे. हे ओळखपत्र आयुष्यभर वैध आहे. पाकिस्तानमधील महानिबंधकांनी यावर सही केलेली आहे. तर जीएफ६८०१२१ हा मुल्ला बरादरच्या पासपोर्टचा क्रमांक आहे. दहा जुलै २०१४ रोजी पासपोर्ट प्रसिद्ध करण्यात आले होते.
अफगाणिस्तानच्या सुरक्षरक्षकांविरोधातील मोहिमेत तालिबानला अनेक दिवसांपासून सैनिकी, आर्थिक आणि गोपनीय मदत पुरविण्याचा आरोप आयएसआयवर लावण्यात येत आहे. परंतु या आरोपांना कोणताच आधार नसल्याचे सांगत इस्लामाबादने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काबूल वॉचर्सच्या माहितीनुसार, मुल्ला बरादरने मुल्ला उमरला सोबत घेऊन तालिबानची स्थापना केली होती. तो पाकिस्तानच्या क्वेटा शहरात राहात होता. तालिबानच्या शुरा काउंसिलचा तो सदस्यही होता. तो मोहम्मद आरिफ आघा नावानेसुद्धा ओळखला जात होता. अमेरिकेसह इतर पश्चिमात्य देशांशी झालेल्या शांतता करारादरम्यान तो दोहा येथे शेर मोहम्मद अब्बास स्टेनेकझईसोबत मिळून तालिबानच्या मुत्सद्देगिरीचे नेतृत्व करत होता.
बरादरच्या कुख्यात बाबी
– मुल्ला बरादर तालिबानच्या संस्थापकांपैकी एक
– तालिबानच्या स्थापनेदरम्यान १९९४ मध्ये तो सहभागी
– १९९६ ते २००१ दरम्यान तालिबानच्या राजवटीत महत्त्वाची भूमिका
– २००१ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर त्याचे अफगाणिस्तानातून पलायन
– २०१० मध्ये पाकिस्तानच्या कराचीमधून अटक
– कतारमधील दोहा येथे तालिबानच्या मुत्सद्देगिरीच्या कार्यालय सांभाळले