मुंबई – ‘ज्यांच्यासाठी जगात कोणी नसते, त्यांच्या पाठीमागे परमेश्वर उभा असतो’, असे म्हटले जाते किंवा ‘जिसका कोई नही होता, उसका खुदा होता है’ अशी जनभावना आहे. मात्र या समाजात अनाथ लोकांचे केवळ जिवंतपणी नव्हे, तर मृत्यूनंतरही हाल होतात. परंतु अयोध्येतील एका अवलिया मात्र बेवारस मृतदेहांची विटंबना होऊ नये तसेच त्यांच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून गेल्या अनेक वर्षापासून सेवाभावी पणे कार्य करत आहेत. अशा या सामाजिक कार्यकर्त्याला राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन गौरविले आहे. मात्र सध्या आजारी आहेत. आणि त्यांची देखभाल व उपचार करण्यात अडचणी येत आहेत.
पद्मश्री पुरस्कार विजेते मोहम्मद शरीफ, (चाचा) यांनी गेल्या २५ वर्षात २५ हजारांहून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जाते, सध्या हे चाचा गंभीर आजारांनी ग्रस्त असून गरिबीमुळे उपचार घेऊ शकत नाहीत. मोहम्मद शरीफ, यांना “लवारीस लाशो का मसिहा” म्हणून देखील ओळखले जाते, ते सध्या अयोध्येतील मोहल्ला खिरकी अली बेग येथील त्यांच्या घरी बेडवर पडलेले आढळले.
पद्म पुरस्कार विजेते, मोहम्मद शरीफ उर्फ ’शरीफ चाचा’ हे “सायकल मेकॅनिक आहेत. मात्र गेल्या २५ वर्षांपासून हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी फैजाबाद आणि आसपासच्या परिसरात २५ हजारांहून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांनी धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही. परंतु आता शरीफ चाचा त्यांच्या पलंगावर जवळजवळ बेशुद्ध पडले होते, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, त्यांना पुरस्काराऐवजी काही पेन्शनची अपेक्षा आहे जेणेकरून ते त्यांचे उपचार घेऊ शकतील. मोहम्मद शरीफ यांचा मुलगा शगीर याने सांगितले की, त्यांना गेल्या वर्षी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाले होते.
शागीर याने सांगितले की, तो खासगी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि महिन्याला ७ हजार रुपये कमवतो. मात्र वडिलांच्या उपचारावर महिन्याला ४ हजार रुपये खर्च येतो. सध्या आमच्यावर खूप कठीण काळ आहे. आम्हाला भाड्याचे घरही परवडत नाही. पैशांच्या कमतरतेमुळे आम्ही आमच्या वडिलांवर योग्य उपचारही करू शकत नाही.