नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओझोन आणि प्राणवायु यांच्या वाढीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने तुळशी रोप लावण्याचा तसेच तुळशीची रोप दान करण्याचा संकल्प करावा असे आवाहन पर्यावरण अभ्यासक विजय गोळेसर यांनी उपनगर येथील भा.वि.जोशी महाराष्ट्र हायस्कूल येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
२००६ मध्ये उपनगरच्या महाराष्ट्र हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत या कार्याची मुहूर्त मेढ रोवली गेली. यंदा त्याला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यावेळी इंटरनेटचा वापर नुकताच वाढू लागला असतांना जागतिक ओझोन दिनाची माहिती मिळाली अन ओझोन रक्षणार्थ प्रबोधनाचे कार्य गोळेसर यांनी सुरु केले. या कार्यक्रमाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजेच ‘युनो’च्या ओझोन समितीने घेतली त्यामुळे या कार्याचा उत्साह अधिक वाढला.
पृथ्वी भोवती असलेले ओझोनचे नैसर्गिक कवच कमकुवत होत असून त्याच्या रक्षणार्थ ‘कार्बनासुराचा वध’ ही मनोरंजक कथा विद्यार्थ्यांना सांगून गोळेसर प्रबोधन करतात. तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने तुळशीच्या रोपांची लागवड करावी यासाठी ओझोन रक्षणाची तांत्रिक आणि शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना गोष्टी रुपाने सांगतात. या व्याख्यानाद्वारे गेल्या १७ वर्षांत सुमारे ३०० शाळांतील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत ओझोन वृद्धिसाठी तुळशीरोप लावण्याचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोह्चविले.
बीएसएनएल मधून २०१६ मध्ये निवृत्त झाल्या नंतर प्रबोधानाच्या या कार्याला वेग आला. दरवर्षी २०ते २२ शाळतील विध्यार्थ्याना ओझोन रक्षणार्थ व्याख्याने देतात. एकाच वेळी अडीच ते पाच हजार विध्यार्थापर्यंत ओझोन रक्ष णा चा मूलमंत्र पोहचवित असल्याने कार्याचा उत्साह वाढल्याचे ते सांगतात. पुण्याच्या ‘तेर पॉलिसी सेंटर’ या पर्यावरण क्षेत्रांत काम करणार्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने गोळेसर यांना ‘प्रकाशाचे बेट’ हा पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. मधली दोन वर्षे शाळा बंद असल्यातरी व्हिडिओ कॉफ्रंसिंगच्या माध्यमातून गोळेसर यांनी विद्यार्थ्यांना ओझोन बाबत जागृत केले. युट्युब वर देखील vijay Golesar या चॅनेल वर त्यांचे ओझोन रक्षण तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत.
व्याख्यानांसह ओझोन रक्षणाच्या संदर्भात निबंध व चित्रकला स्पर्धा आणि वृक्ष दिंडीतुन तुळस रोपांची लागवड करण्याचे उपक्रम गोळेसर राबवित आहेत. शाळांना यूनोने तयार केलेल्या ‘ओझोन विचारतत्व शिक्षण संच’ या विशेष पुस्तिकेच्या मोफत वितरणा बरोबरच विध्यार्थ्याना युनोच्या ओझोन समितिच्या ‘ओझी ओझोन’ या लघुपटातून ते ओझोन चे महत्व पटवून देतांत. पृथ्वीवर संरक्षक छत्र धरणारा ओझोन वाचविणे हे आपल्या सर्वांच्याच हातात आहे त्यामुळे अधिकांत अधिक लोकांनी तुळस लावण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन विजय गोळेसर यांनी यानिमित्त केले आहे.
Ozone Day Special Vijay Golesar Initiative for Awareness