मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यंदा जिल्हा माहिती अधिकारी, सहायक संचालक, व माहिती अधिकारी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो उमेदवारांना या संधीला मुकावे लागत आहे. त्यामुळे या पदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी व पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीधारकांनाही यासाठी अर्ज करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या पदांसाठी ४६ जागांची भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीसाठी पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील उच्च शैक्षणिक अर्हता असतानाही उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना अपात्र असल्याचे संदेश प्राप्त झाले. त्यामुळे हजारो उमेदवार हे भरतीसाठी पात्र असतानाही त्यांना या संधीपासून मुकावे लागत आहे. ही बाब दानवे यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून उमेदवारांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवून त्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी असे म्हटले आहे.
माहिती व प्रशासन खाते हे राज्याच्या प्रसिद्धीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे या ठिकाणी योग्य उमेदवारांची नेमणूक होण्यासाठी पदव्युत्तर धारकांनाही अर्ज करण्याची मुभा देण्यात यावी,जर पदव्युत्तर पदवीधारकांना यासाठी अर्ज करता येत नसेल तर तो एकप्रकारे त्यांच्यावर अन्याय ठरेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या यापूर्वीच्या जाहिरात क्र.४२/२०१७, ५९/२०१७ व ०३/२०२१ पदांसाठी सुरूवातीस ऑनलाईन अर्ज भरताना पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी धारकांना अडचणी आल्या होत्या. कालातरांने त्यात दुरूस्ती करण्यात येऊन अर्ज स्विकारले गेले होते. ही बाब दानवे यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून यंदाही यात बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्याच्या जाहिरात क्र.१२९, १३० व १३१ च्या माध्यमातून ही पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीधारकांना ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देऊन तात्काळ दिलासा देण्याची मागणी दानवे यांनी आयोगाकडे केली आहे.
Opposition Leader Amdadas Danve Letter to MPSC Chairman