कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांची होत असलेली परवड किती भीषण आहे याचे ज्वलंत उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. तब्बल ५१२ किलो कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याच्या पदरी अवघे २ रुपये पडले आहेत. विशेष म्हणजे, या २ रुपयांचाही व्यापाऱ्याने चेक दिला आहे. त्यामुळे हा चेक बँकेत टाकल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी शेतकऱ्याच्या बँक खात्यात २ रुपये जमा होणार आहेत.
प्रचंड कष्ट करुनही शेतकऱ्याच्या पदरी काहीच पडत नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. कोणतेही सरकार आले आणि कितीही आजवर निर्णय घेतले गेले तरी शेतकऱ्याला त्याची हक्काची आणि योग्य कमाई कधीच मिळत नाही. सध्या कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत. कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका शेतकऱ्याची व्यथा उघड करुन कांदा उत्पादकांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे.
राजू शेट्टी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले. ते बघा निर्लज्ज व्यापार्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. व्यापारी शेतकर्यांना सांगतो १५ दिवसाने हा चेक वटेल.
https://twitter.com/rajushetti/status/1628282583569297410?s=20
Onion Farmer Trouble 2 Rs Cheque of 512 Kg Onion
EX MP Raju Shetti