नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील चिंता कायम आहे. तसेच याविषयी विविध माहिती आता समोर येत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने अधिक वेगवान असून, तो लशीचा परिणाम कमी करतो. आकडेवारीतून ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने रविवारी एक निवेदन जारी केले. त्यानुसार, प्राथमिक पुरावे हेच स्पष्ट करतात की, ओमिक्रॉन हा व्हेरिएंट संसर्ग आणि संक्रमणाविरुद्ध लशीचा प्रभाव कमी करतो. परंतु सुरुवातीला मिळालेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या डेल्टा आणि इतर दुसर्या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन नागरिकांना गंभीर आजारी करू शकत नाही. लक्षणांसह त्याचे संक्रमणसुद्धा कमी धोकादायक आढळले आहे.
यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकार्याने सांगितले, की ओमिक्रॉन अधिक गंभीर आजारी करू शकत नाही. परंतु सध्या वेगाने उत्परिवर्तित होणार्या या व्हेरिएंटबद्दल खूप माहिती अद्याप मिळणे बाकी आहे. कोरोना प्रतिबंधित लशीला ओमिक्रॉन मात देऊ शकतो, याबद्दलसुद्धा कोणतेच स्पष्ट संकेत मिळाले नाहीत. सध्या जे काही संकेत मिळत आहेत ते पाहून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
ओमिक्रॉनविरोधात लशीच्या प्रभावाबद्दल बायोएनटेक आणि फायझर लसनिर्माता कंपन्यांनी नुकतेच अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार, लशीचे दोन डोस अँटीबॉडीला थोडे कमी विकसित करतात. परंतु तिसर्या (बूस्टर डोस) डोसमुळे माणसाच्या शरीरात २५ टक्के अँटिबॉडी वाढतील. एकणूच लशीचा तिसरा डोस घेताच शरीरात ओमिक्रॉनशी लढण्यासाठी अँटिबॉडी सक्षम होणार आहे.