इंडिया दर्पण विशेष लेखमाला – सुप्रसिद्ध दत्तस्थाने
नरसोबाची वाडी
तिसरा अवतार. : दत्तात्रेय
भगवती श्री हरी कार्तिक वद्य द्वितीयेच्या दिवशी, मृग नक्षत्रावर, शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळी प्रथम मुहूर्तावर लहान मुलाच्या रूपात अत्रीऋषींसमोर प्रकट झाले. त्यांची प्रभा रंगीत इंद्रनील मण्यासारखी होती. ते नीलवर्ण असून त्यांचा चेहरा चंद्रासारखा आनंददायी होता. ते चतुर्भूज असून त्यांच्या चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म होते. विभूती त्यांच्या शरीरावर विलेपित होती आणि त्यांच्या कपाळावर केसांचा बटा होत्या. अशा स्वरूपात ते अत्रीऋषींसमोर आले आणि म्हणाले, “दत्तोsहम्” (ज्या परमात्म तत्वाची तुम्ही पुत्र म्हणून ईच्छा केलीत तो मी तुमच्यासमोर पुत्र म्हणून उभा आहे.) यावर ऋषीदांपत्य अत्री व अनसूया म्हणाले, “जगदीश्वरा जोपर्यंत तू आमच्यापोटी जन्म घेत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होऊ शकणार नाही.” त्यांच्या या प्रार्थनेला प्रसन्न होऊन, श्री हरींनी ज्योतीरूपाने अत्रीऋषींच्या हृदयांत प्रवेश केला आणि त्यानंतर अत्रि-अनसूयेच्या पुत्राच्या रूपाने जन्म घेतला.
इंद्रनील मण्यासारखी आभा असलेल्या, भस्मविलेपित विग्रह (म्हणजे रूप) असलेल्या, दत्तात्रेय अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो. हाच दत्तात्रेयांचा ‘दत्तात्रेय’ नामक श्री दत्तात्रयांचा हा अवतार याच नावाने ओळखला जातो. अत्रिवरद अवतारात श्री दत्तात्रेयप्रभू ने अत्रिऋषींना, मी तुम्हाला स्वतःला अर्पण करून घेवून तुमच्या येथे पुत्ररुपाने अवतार घेईन असा वर दिला असल्यामुळे ते अत्रिवरद झाले. अत्रिवरद या अवतारात परमेश्वराने अत्रिमुनींना त्रिमूर्तीच्या रुपाने दर्शन देऊन फक्त वरच दिला.
पुत्ररुपाने अवतार घेऊन मी तुमच्या वंशाला भूषविन एवढेच सांगून ते अंतर्धान पावले. त्यानंतर अत्रिमुनि व सती श्री अनसूया यांनी त्रिमूर्ती या रुपाने परमेश्वराचे सतत चिंतन केले. काही काळाने परमेश्वराने अत्रिऋषींना व अनसूयेला प्रत्यक्ष दर्शन दिले. “मी तुम्हा उभयतांच्या तपश्चर्येने व अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन तुम्हांला इष्ट वर दिलेला आहे. त्याप्रमाणे आज मी तुमच्यापुढे स्वत:ला अर्पण करुन दत्तारुपाने तुमच्या सानिध्यात अवतरत आहे”. तोच हा अवतार संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेय नावाने प्रसिध्दीस आला. दत्तात्रेय यांचा हा अवतार कार्तिक वद्य व्दितीयेच्या दिवशी झाला. त्या दिवशी शुक्रवार असून मृग नक्षत्र होते.
जन्म:- कार्तिक कृष्ण २
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी: दत्तप्रभूंची राजधानी
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मिरजे पासून जवळ, कृष्णा – पंचगंगा नद्यांच्या संगम स्थळी नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी हेदत्त भक्तांचे अतिशय प्रसिद्ध स्थान आहे. सत्पुरूष श्री नरसिंहसरस्वती यांनी येथे १२ वर्षे वास्तव्य केले. श्रीदत्त नवरात्रोत्सवा निमित्त आज आपण नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडीला जाणार आहोत.

मो. ९४२२७६५२२७
वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले.
नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो.
पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवने आणि पदांचा उच्चरवात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. वर्षभरातील विविध उत्सव, नृसिंहजयंती, रामनवमी व इतर सणकादीक पुण्यतिथ्या व सण नियमित साजरे केले जातात.
नदी किनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होतं. साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी नृसिंहवाडीचा विस्तार तुलनेनं मर्यादित होता. गर्दीदेखील मर्यादित होती. विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठय़ा प्रमाणात धर्मशाळा, भक्तनिवास, प्रसादालय, वेद उपासनेच्या सुविधा यामुळे क्षेत्र बाराही महिने गजबजलेले असते. नदीकिनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसर भव्य झाला आहे.
वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही.
श्रींची पूजा, अर्चना व दिनक्रम
श्रीनृसिंहवाडीच्या या परमभाविक सेवेकऱ्यांनीच आपल्या प्रेमाने गुरूमाऊलीला सतत जागृत ठेवले आहे. म्हणूनच आजही हजारो भक्तांनी या पुजाऱ्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे श्रीदत्तगुरूंनी दिलेल्या फळांचा रोकडा अनुभव घेतला आहे. या ठिकाणी अनेक भक्तानी, त्यामध्ये आर्त, जिज्ञासू अर्थार्थी यांच्या कामना श्री महाराज पूर्ण करीत असल्याने हे स्थान आसपासच्या गावांत प्रसिद्ध झाले. या ठिकाणी वास्तव्य करून सर्व ब्रह्मवृंद या मनोहर पादुकांची तीन त्रिकाळ अर्चना करीत असून, ही अर्चना चालूच आहे.
श्रींच्या मनोहर पादुका
प्रात: काळापासून या अर्चनेस आरंभ होतो. भूपाळ्या, काकड आरती हा उपक्रम असतो. थोड्यावेळाने श्री सूर्यनारायण उदयाचलावर येण्यापूर्वी श्री महाराजांना कृष्णामातेच्या जलाने स्नान घातले जाते व पंचोपचार पूजा करुन महाराजांच्या पादुकांवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते व त्यावर नागदेवतांची स्थापना करून प्रात: कालची पूजा संपूर्ण होते. नंतर ९ वाजणेचे सुमारास अनेक भक्तगण बाहेरगांवचे येऊन, स्नान करून, पंचामृत पूजेस सिद्ध असतात. अर्चक स्नान करून पादुकांवरील वस्त्र दूर करून श्री पादुका भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पंचामृत स्नानास सिद्ध करतात. हा उपक्रम साधारणपणे तीन तास चालू असतो.
खरोखरच श्री दत्त महाराजांच्या नामस्मरणाने सारे विकार शांत होतात. परमपावन दत्तकथा भवरोग्याला अमृतवल्ली सारख्या असतात आणि त्यांच्या श्रवणाने भवबंधन बाधीत नाही. पवित्र दत्तप्रबोधिनी मात्रा भवरोग्याने घ्यावी आणि जन्मकर्माची यात्रा चुकवावी. जीवाच्या जन्म-मृत्यूच्या रहाटगाडग्याची समाप्ती व्हावी म्हणून सतत प्रबोध करून श्रमलेल्या श्रीगुरूपादुकांची गुरूभक्त क्षणभर विसरू शकत नाही. सात्त्विक बुद्धीने वर्तन करणाऱ्या भक्तांवर श्रीगुरूंची फार मोठी प्रीती असते; म्हणून अत्रि-अनसूया, राजा-सुमति, अंबा-माधव या सात्विक पतीपत्नींच्या श्रद्धा, निष्ठा, प्रेम या गुणांमुळे श्रीगुरूंनी गर्भव पत्करला. अवधूत, ब्रह्मचारी, संन्यासी अशा वेषांनी समाजाला प्रबोधन केले.
कृष्णामाई उत्सव
नृसिंहवाडीत कृष्णामाई उत्सव कार्यक्रम अव्याहत चालू आहे. अनेक भक्त आपापल्या वाहनातून नित्य येथे येतात. गंगेचे स्नान करून श्री महाराजांच्या विविध पूजेत सहभागी होतात. या ठिकाणी श्री महाराजांचे उत्सवही साजरे केले जातात. श्री दत्तजयंती, श्री गुरु द्वादशी श्री नृसिंह जयंती. श्री गुरुप्रतिपदा, श्री गुरुपौर्णिमा, श्री नारायण स्वामींचा उत्सव, श्री टेंबे स्वामींचा उत्सव हे उत्सव साजरे केले जातात. दसऱ्याचे दिवशी श्री महाराज आपल्या वैभवाने युक्त असे नटलेले शिलंगणास जातात. दीपावलीस सर्व अर्चकांच्या स्त्रिया दिव्यवस्त्र परिधान करून श्री महाराजांना ओवाळतात. पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत श्री महाराजांचे दर्शनास लांबलांबचे भक्त येत असतात. ते महाराज संन्यासी असल्यामुळे पवित्र्य कायम राखण्यासाठी मंडपात अर्चकांशिवाय कोणासही प्रवेश देत नाही. सायंकाळचे वेळी सनई व चौघडा यांचे वादनाने श्री महाराजांना संतोषित केले जाते.
नृसिंहवाडीमध्ये श्री मारुतीरायाचे मंदिर आहे. श्री ब्रह्मानंदस्वामी, श्री नारायणस्वामी मंदिरे, वगैरे देवतांची मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी श्री गंगामाई श्री कृष्णामाईला भेटायला येते. लाखो भाविक या सोहळ्यात समाविष्ट होतात व आपल्याला पुनित करून घेतात. गावाचे बाहेर रम्य ठिकाणी वेदपाठशाळेची स्थापना झाली असून त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्जन करीत असतात. त्याबाहेर सुगंधित पुष्पांची बाग आहे. त्या बागेतील फुले महाराजांना अर्पण केली जातात. एरवी शेजारती नंतर देवांच्या कट्टयावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात. देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायची असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात.
देवाच्या कट्टयावर मागील बाजूच्या ओवरीत एका मोठ्या परातीत अभिषेकासाठीच्या दत्तपादुका ठेवल्या जातात. एका मोठ्या अडणीवर अभिषेकपात्र ठेवले जाते. अत्यंत कडक सोवळ्यात आठ दिवस संततधार चालू असते. दहा ब्राह्मण सोवळ्याने नदीचे पाणी आणून हंडे भरत असतात. दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेदपठण करीत असतात. पादुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल मृत्युहरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते.
श्रीनरसिंहसरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते. सातही दिवस श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू असतो. ब्राह्मणांना अल्पोपहार, भोजन सर्व दिले जाते. समाप्तीला १० ते १५ ब्राह्मण सामुदायिक पवमानसूक्त म्हणतात तेंव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात. मग सेवेकरी ब्राह्मणांना वस्त्र, दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मिष्टान्नभोजन देऊन समारोप होतो. मित्रमेत्रिणिंनो, मध्यरात्रीच्या शांततेत, मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या धीरगंभीर वेदपठणाने ब्रह्मानंद होतो. जरूर लाभ घ्या.
श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थान
श्री क्षेत्र नृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, पिनकोड नं. ४१६१०४.
फ़ोन: (०२३२२) २७०००६, २७००६४, २७०५०१
संदर्भ : गुरुचरित्र, धार्मिक ग्रंथ आणि काही संकेतस्थळे