खोपोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज सकाळी येथे एक भीषण अपघात झाला आहे. खापोली परिसरात खासगी बस रस्त्यावरून उतरून खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर लगेचच स्थानिक ग्रामस्थांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खासगी बस पुण्याहून मुंबईकडे जात होती. मुंबई-पुणे महामार्गावर शिंगरोबा मंदिराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्यापासून दूर जाऊन थेट दरीत कोसळली. बसमध्ये सुमारे ४१ प्रवासी होते. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्याचे काम बचाव कर्मचारी करत आहेत.
Accident on Old Mumbai-Pune Highway near borghat pic.twitter.com/A03i6DC1Kp
— Pravin Wadnere (@pravinwadnere) April 15, 2023
बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते. त्यातील २७ प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. इतरांना वर काढण्याचे कार्य सुरू आहे. बचाव कार्यामध्ये खोपोली व खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस, आपत्ती प्रतिसाद दल यांचा समावेश आहे. बसमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
मुंबई – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
Old Mumbai Pune Highway Bus Accident 13 Death